Sun, Aug 25, 2019 12:21होमपेज › Pune › तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची करवसुलीची धडक मोहीम

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची करवसुलीची धडक मोहीम

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:39AM तळेगाव दाभाडे : वार्ताहर 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने करवसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून यावर्षी 100 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले. यावर्षी घरपट्टीची एकूण मागणी 16 कोटी 44 लाख रुपये तर पाणी पट्टीची एकूण मागणी 5 कोटी 10 लाख रुपये आहे. आतापर्यंत 8 कोटी 54 लाख तर पाणीपट्टीपोटी 1 कोटी 55 लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी  दिली. 

शहरात एकूण 28 हजार मालमत्ताधारक असून 16 हजार नळजोड आहेत. करवसुलीसाठी नगरपरिषदेकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली असून शहराचे एकूण आठ विभाग करण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले.  

करनिरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली अधिकारी संभाजी भेगडे, सुनील कदम, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी, आदेश गरुड विशेष प्रयत्नशील आहेत. सर्व मालमत्ताधारकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलांचे वाटप करण्यात आलेले असून मोठ्या थकबाकीदारांची विशेष यादी तयार करण्यात आली आहे. जप्ती वॉरंट तयार करून संबंधितांना बजावण्यात आले असल्याचे भालेराव आणि आवारे यांनी सांगितले. नागरिकांनी आपआपले कर येत्या मार्चअखेर पूर्ण भरून विकासाच्या कामात योगदान द्यावे असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.