होमपेज › Pune › नवनवे तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर न्या

नवनवे तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर न्या

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता ते शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत घेऊन जा. शेतकरी विद्यापीठ, जमीन प्रयोगशाळा व हवामान विभाग यांनी परस्परांशी संवाद साधतशेतकर्‍यांना मदत करायला हवी. शेतकरी असंघटित असल्याने ते दुर्लक्षित आहेत. त्यामुळे शाश्‍वत शेतीसाठी सर्वांनी मिळून शेतकर्‍यांसोबत काम करणे गरजचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

वैकुंठभाई मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, एस. के. पट्टनायक, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ उपस्थित होते. शेतीचा शाश्‍वत विकास करण्यासाठी शेतकर्‍यांना वीज, सिंचन, पायाभूत सुविधा, कर्ज आणि विमा क्षेत्र, निश्‍चित बाजारभाव, विपणन व्यवस्था, हवामान विभागाशी संवाद या सुविधा देणे आवशक आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील 50 ते 55 टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. मात्र राष्ट्रीय सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ 10 टक्के आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्राला फटका बसतो. महाराष्ट्रात जलयुक्‍त शिवार योजनेमुळे गेल्यावर्षी सरासरीच्या 80 टक्के पाऊस होऊनही, शेती उत्पादन 110 टक्के झाले.  शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात भारत हा कृषीमाल निर्यातदार देश झाला आहे. देशातील शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी त्यांच्या कौशल्य विकास, व्यापार कौशल्य आणि कृषी क्षेत्रात येणार्‍या नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच शेतकर्‍यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. यावेळी  डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ‘ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर’ या विषयावर सादरीकरण केले.  

कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा

शेतकरी कर्जमाफीबाबत उपराष्ट्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की कर्जमाफी हा शेतकर्‍यांना मिळालेला तात्पुरता दिलासा आहे. त्यापेक्षा  शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्याची तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे. डॉक्टर, इंजिनिअर हे त्यांच्या मुलांना त्यांचा व्यवसाय शिकवतात. पण, शेतकरी मात्र त्याच्या मुलाला शेतकरी करू इच्छित नाही, याचा विचार आपण करायला हवा, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.