Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Pune › चोवीस तासांत अवैध दारूवर कारवाई करा

चोवीस तासांत अवैध दारूवर कारवाई करा

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या बेकायदेशीर दारू धंद्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी चोवीस तासाची वेळ दिली असून, त्यांनी धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी या धंद्यावर छापे मारून कारवाई करणार आहेत. या छापेमारीत कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे धंदे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

अवैध धंद्यांमुळे शहराचे स्वास्थ्य बिघडत आहे. त्यातही या अवैध धंद्यांना मिळणारा पोलिसांचा आर्थिक आशीर्वाद यामुळे ही परिस्थिती आणखीनच वाढत आहे. शहरातल्या काही भागांमध्ये सुरू असणार्‍या अवैध दारू विक्रीने लाखोंची उलाढाल पार केली आहे. हातबट्टी आणि चोरून दारू विक्रीचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे शहरात कुठेही बसा अन दारू प्या, असेच चित्र आहे. मुख्य रस्त्यांवर अंधारातील पीएमपीच्या बस स्टॉपवर मद्य शौकीन बाटल्यांवर बाटल्या पित आहेत. त्यामुळे अशी बस स्थानके नेमकी पुणेकरांसाठी आहेत, की मद्यपींसाठी हेही समजण्या पलीकडचे आहे. तर, अंडा भुर्जीचे गाडे व अंधारमय परिसर मद्यपींच्या हक्काच्या जागा बनल्या आहेत. यामुळे शहराचे स्वास्थ्य तर बिघडत आहेच, पण त्यासोबतच गुन्हेगारीलाही चालना मिळत आहे. 

गेल्या आठवड्यात विश्रांतवाडी भागात मोठ्या दारू अड्यावर वरिष्ठांच्या समक्ष कारवाई करण्यात आली. जवळपास 15 लाखाचा माल सापडला. त्यामुळे इतके दिवस सुरू असणारी ही दारू विक्री आतापर्यंत कशी दिसली नाही, असेही विचारले गेले. शहरात छुप्या पद्धतीने साठवणूक आणि त्याची विक्री होत आहे. हडपसर, वारजे, सिंहगड, येरवडा, खडकी यासह इतर भागांमध्येही अवैध दारू विक्री मोठ्या तेजीत सुरु आहे. तर, शहर ग्रामीणच्या बोर्डावर आता या अवैध दारूचे उत्पादन होत आहे. त्या ठिकाणावरून ही दारू शहरात आणली जात आहे. 

काळ्या ‘कँड’मधून वाहतूक...

शहरात येणारी दारू ही काळ्या ‘कँड’मधून येते. काळे कँड 800 ते 1 हजार रुपयांना मिळते. त्यातही नंतर पाण्याची भेसळ करून याची विक्री होते. त्यानंतर शंभर आणि दोनशे ‘एमएल’चे फुगे तयार करतात. हे फुगे 20 रुपयांना विकतात. गेल्या काही महिन्यात शहर व ग्रामीण पोलिसांच्या बॉर्डवर तयार केली जात आहे. त्यामुळे ही दारू आता थेट सोलापूर व नगर बॉर्डरवर तयार करून शहरात आणली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

...तर शिस्तभंगाची कारवाई 

स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक; तसेच त्या विभागाचे सहायक आयुक्तांनी आपापल्या हद्दीतील अवैध दारू उत्पादन, वाहतूक व विक्री; तसेच साठ्याविरूद्ध चोवीस तासांत धाडी टाकून परिणामकारक कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे. चोवीस तासांनंतर गुन्हे शाखेकडून धाडी घालण्यात येणार आहेत. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री सापडेल, त्या ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे. 

 

Tags ; pune, pune news, alcohol, action,