Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Pune › ... तर नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री खरेदी

... तर नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री खरेदी

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:04AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेट देण्यासाठी  ताडपत्री खरेदीस निधी न दिल्यास नगरसेवकांचे मानधनातून ती खरेदी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटवस्तू देण्याची जुनी परंपरा खंडित केली जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सोमवारी (दि.2) स्पष्ट केले. 

दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याबाबत गटनेत्यांची सोमवारी बैठक झाली. बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या खर्चातून भेटवस्तू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेस भेटवस्तू खरेदी करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते साने, शिवसेने गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पालिकेकडून खरेदी होणार नसेल, तर नगरसेवकांच्या मानधनातून भेटवस्तू खरेदी केली जावी, असे आग्रही मागणी केली. 

.पिंपरी-चिंचवड शहराला संतांचा वारसा आहे. पालिकेच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देऊन गौरविले जाते. यंदा ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत आहे, असा आरोप साने यांनी केला. विविध महापुरूषांच्या जयंती महोत्सवावर खर्च केला जात आहे. मात्र, वारीसाठी कायदा आडवा येतो का, असा सवाल त्यांनी केला. कायद्यामुळे भेटवस्तू खरेदीस अडचणी येत असतील, तर नगरसेवकांच्या मानधनातून ती खरेदी केली जाईल. मात्र, पालिकेची ही जुनी परंपरा खंडित होऊ देणार नाही, असे साने यांनी स्पष्ट केले.  दिंडीप्रमुखांना 2 हजार 800 रूपयांची ताडपत्री 1 हजार 800 रूपयांस उपलब्ध करून देण्यास एक पुरवठादार तयार आहे. दोन दिवसांमध्ये पालिकेचे नाव छापून ताडपत्री दिली जाईल, असे साने यांनी सांगितले. दरम्यान, दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याची जुनी परंपरा खंडित करू नये, या मागणीसाठी शहरातील टाळकरी व साप्रंदायिक क्षेत्रातील वारकरी मंडळी पालिका भवनात आले होते. त्यांनी आयुक्तासह महापौर नितीन काळजे यांना जाब विचारला. दिंडीप्रमुखांचे भेटवस्तू देऊन योग्यपद्धतीने स्वागत करण्याची मागणी केली. 

आकुर्डी मुक्कामी सोईबाबत पालिका उदासीन 

जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी (दि.6) आकुर्डीतील विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी आहे. त्यास केवळ 3 दिवस शिल्‍लक आहेत. मात्र, आतापर्यंत येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. तब्बल 500 मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, सदर निविदेस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे टॉयलेटची सुविधा कशी उपलब्ध होणार असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते दत्ता साने व नगरसेवक जावेद शेख यांनी उपस्थित केला. पालखी मुक्कामाच्या तयारीसंदर्भात महिन्यापूर्वी दोन ते तीन वेळा आयुक्तांसोबत बैठका होत होत्या. मात्र, यंदा एकही बैठक झालेली नाही. तसेच, पालखी निगडी शहरात प्रवेश करते, त्या ठिकाणचे रस्ते व्यवस्थित केले नसून, स्वागत कमानही टाकण्यात आलेली नाही. तयारीबाबत पालिका प्रशासनाचे अद्याप कोणतेही नियोजन दिसत नसल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला.