Mon, Jun 17, 2019 05:02होमपेज › Pune › मार्च २०१९ नंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकच सेवेत

मार्च २०१९ नंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकच सेवेत

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य शासनाने नुकतेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना  शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र याचसाठी केंद्र शासनाने अगोदरच 2015 साली 4 वर्षे मुदतवाढ दिली होती. त्यामुळे शासनाने आपला निर्णय बदलला असून, आता मार्च 2019 पर्यंत सेवेत असणारे; परंतु टीईटी परीक्षा उत्तीर्ण न होणार्‍या सर्व  शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश अप्पर सचिव सं. द. माने यांनी दिले आहेत. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना आता कोणतीही संधी दिली जाणार नसल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 23 च्या तरतुदीस अनुसरून शिक्षकपदावरील नियुक्तीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्‍चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना केंद्र शासनाने केली आहे. या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणांचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. 

त्यासाठी शासनाने 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना तीन प्रयत्नात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, केंद्र शासनाने अगोदरच 2015 साली टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना 4 वर्षे मुदतवाढ दिली होती. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या तीन संधीची मुदतवाढ ही केंद्र शासनाच्या धोरणाशी विसंगत होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाने आपला निर्णय मागे घेतला असून, नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 2013 नंतर अल्पसंख्याक शाळांसह इतर शाळांमध्ये ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्या सर्व शिक्षकांना येत्या मार्च 2019 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर मात्र जे शिक्षक  ही परीक्षा  उत्तीर्ण होणार नाहीत अशा सर्वच शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येणार आहेत.