Sun, Aug 25, 2019 12:33होमपेज › Pune › ‘टीबी’च्या विळख्यात

‘टीबी’च्या विळख्यात

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

क्षयरोग झालेल्या (टीबी) रुग्णांचा संसर्ग झाल्याने ससून रुग्णालयात उपचार करणार्‍या 10 ते 12 निवासी डॉक्टरांना दरवर्षी या आजाराची लागण होत आहे. ‘टीबी’ची लागण डॉक्टरांना होऊ नये यासाठी त्यांची प्रतिकारशक्‍ती वाढवण्यास ‘वैद्यकीय शिक्षण व संशोधन’ विभागाकडून रोज सकाळी पोषण आहार (प्रोटीन डाएट) सुरू करण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडून होत आहे. 

क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ नावाच्या जीवाणुंमुळे होणारा आजार असून, बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर इतरांना जसा होतो, तसा डॉक्टरांनाही होतो. निवासी डॉक्टर हे रात्रंदिवस काम करतात. अपुरी झोप, कामाचा ताण, सकाळी नाष्टा न करता रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग; तसेच आंतररुग्ण विभागात रुग्ण सांभाळताना त्यांची प्रतिकारशक्‍ती कमी झालेली असते. या वेळी ‘टीबी’ झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना याचा संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. केवळ क्षयरोगाच्याच नव्हे तर सर्व विभागातील डॉक्टरांना हा धोका असल्याचे निवासी डॉक्टर सांगतात.

क्षयरोग झालेल्या रुग्णावर इतर शस्त्रक्रिया किंवा अशा महिलांची प्रसूती असेल तर त्यांच्यावर उपचार करणार्‍या निवासी डॉक्टरांना त्याचा धोका वाढतो; तसेच वातानुकूलित यंत्रणेमुळेही टीबीच्या जीवाणूंचा संसर्ग होतो. ससूनमध्ये प्रत्येक वर्षी दहा ते 15 डॉक्टरांना टीबी होत आहे. सध्या दोन निवासी डॉक्टरांना साध्या औषधांना दाद न देणारा ‘एमडीआर टीबी’ झाला आहे. सायन हॉस्पिटलला 2013 मध्ये 24 वर्षीय निवासी डॉक्टराचा टीबीची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. यावरून हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे दिसून येत आहे. 

निवासी डॉक्टरांची प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी त्यांना रोज सकाळी पोषण आजार ज्यामध्ये अंडी, दूध यांचा समावेश असलेला आहार देणे गरजेचे आहे. नाष्ट्याच्या सुविधा मुंबई महापालिकेच्या चारही शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना सुरू करण्यात आलेली आहे. मग राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात का नाही, असा प्रश्‍न निवासी डॉक्टरांकडून विचारण्यात येत आहे. सध्याच्या नियमानुसार टीबी झालेल्या डॉक्टरांना दोन महिन्यांची रजा देण्यात येते. 

राज्यात 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये

राज्यात 17  शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून, येथे जवळपास साडेचार हजार निवासी डॉक्टर काम करतात. त्या सर्वांना नाष्ट्याच्या अभावी ‘टीबी’ होण्याचा धोका आहे. निवासी डॉक्टरांना पोषण आहार सुरू करण्यासाठी ‘डीएमईआर’ने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदनही ‘बीजे मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.