Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Pune › खो-खोला अपेक्षित स्थान नाही : शरद पवार 

खो-खोला अपेक्षित स्थान नाही : शरद पवार 

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्राने तयार केलेला खो-खो सारखा खेळ आणि शरीर संपदाबरोबरच बुध्दिमत्तेचा आहे. या खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित असे स्थान मिळाले नाही, अशी खंत माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्‍त केली. 

सिम्बायोसिस स्पोर्ट सेंटरच्या वतीने सिम्बायोसिस आदर्श क्रीडा संस्था पुरस्कार शहरातील मानांकित पाच संस्थांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ शां ब. मुजुमदार, स्पोर्ट सेंटरचे मानद संचालक डॉ सतीश ठिगळे, उपाध्यक्ष  डॉ ए. बी. संगमनेरकर, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, सन्मित्र संघ, महाराष्ट्रीय मंडळ, नव महाराष्ट्र संघ आणि दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फौंडेशन या संस्थांचा समावेश आहे. यावेळी क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल पद्मश्री मिळालेले मुरलीकांत पेटकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पवार  म्हणाले की, मी विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधीत्व करीत असताना खेळ, खेळाडू, खेळाचे नियम, खेळाडूंची निवड यापासून दूर राहिलेलो आहे. त्या-त्या क्षेत्रातील जाणकारांनी त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत. मात्र त्यांना समाजाचा आश्रय मिळवून देण्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेटकर सारख्यांना उशिरा पद्मश्री मिळाला असला तरी हा तुमचा नसून त्या पुरस्काराचा सन्मान झालेला आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी आयुष्यात काम करु नका, असा सल्‍लाही त्यांनी यावेळी दिला. 

डॉ मुजुमदार म्हणाले की, या संस्था स्थापन होऊन अनेक वर्ष उलटली आहे; मात्र आजही संस्थापकांची नावे कोणाला माहिती नाहीत. या निमित्ताने त्यांची आठवण व्हावी हा या पुरस्कारामागचा भाग आहे. सामाजिक हित जपण्याकरता या संस्था स्थापन केल्या असून त्यांच्या वारासदारांनीही हा वारसा जपल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश ठिगळे यांनी तर डॉ. विद्या येरवडेकर यांनी आभार मानले.