होमपेज › Pune › स्वाइन फ्लूने पिंपरीत दोन रुग्णांचा मृत्यू

स्वाइन फ्लूने पिंपरीत दोन रुग्णांचा मृत्यू

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 1:35AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी आणखी दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. माण येथील 72 वर्षीय महिलेचा, तर मलकापूरच्या 60 वर्षीय वृद्धाच्या मृत्युने शहरातील स्वाइन फ्लू बळींची संख्या 13 वर पोहचली.  बुधवारी आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात रुग्णांची संख्या 79 झाली आहे.

राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. माण येथील 72 वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून रविवारी (दि. 2) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लूचा त्रास वाढल्याने त्याच दिवशी त्या महिलेला कृत्रिम श्वासोच्छश्‍वासावर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी (दि. 4) त्या महिलेचा मृत्यू झाला.

मलकापूर, बुलडाणा येथील एका 60 वर्षीय रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून शुक्रवारी (दि. 31) शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना रविवारी (दि. 2) कृत्रिम श्वासोच्छश्‍वासावर ठेवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचादेखील मृत्यू झाला.

सध्या 25 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.