Wed, Apr 24, 2019 15:46होमपेज › Pune › जलतरण तलावाला कोणी पंप देता का पंप ?

जलतरण तलावाला कोणी पंप देता का पंप ?

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:23AMभोसरी :विजय जगदाळे 

महापालिकेच्या स्थापत्य विभागाने जलतरण पर्यवेक्षकाच्या सुचनेनुसार लाखो रुपये खर्च करून भोसरीच्या जलतरण तलावाचे नूतनीकरण केले; परंतु गेले अनेक दिवस हा तलाव बंद अवस्थेत आहे. हा तलाव नवीन पंपाच्या प्रतीक्षेत आहे.  लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तलावास काही हजारो रुपयांचा पंप मिळत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तलाव सुरू करण्यास दिरंगाई करणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक नितीन लांडगे व नागरिक करीत आहेत.

भोसरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी कै. बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली. परिसरातील नागरिक तसेच जलतरणप्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. मात्र, गेले अनेक दिवस  तलाव बंद असल्याने पोहण्यासाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच, जलतरणपटूंना देखील नियमित सरावापासून वंचित रहावे लागत आहे.
या तलावावरील फिल्टरेशन पंप अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे तो सारखा बिघडत आहे. येथील पंप बदलण्यासाठी प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलली जात नसल्याचे नागरिक सांगतात. पंप बदलल्याशिवाय या तलावाचा वापर जलतरणप्रेमी व जलतरणपटूंना घेता येणार नाही.

जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येत असल्याने लवकरात लवकर पंप बसवण्याची मागणी करण्यात येत आहे