Wed, May 22, 2019 06:27होमपेज › Pune › या उड्डाणपुलांखाली घडतंय काय?

या उड्डाणपुलांखाली घडतंय काय?

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:45PMपुणे : प्रसाद जगताप

महाराष्ट्र शासन, पालिका प्रशासनाकडून शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता शहरासह महामार्गांवर उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्या उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडी सुटत असली, तरी या उड्डाणपुलांखाली असंख्य अवैध प्रकार सुरू आहेत. संबंधित प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात स्वारगेट, शिवाजीनगर (पाटील इस्टेट), धायरी, बालाजीनगर, कोथरूड-कर्वेनगर यांसह राज्य महामार्गावर, वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत; मात्र, प्रशासनाकडून वेळोवेळी येथे पाहणी होत नसल्याने शहरातील प्रत्येक उड्डाणपुलाचा समाजकंटकांकडून गैरवापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने उड्डाणपुलांचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

शहरातील सर्वच पुलांखाली काही ना काही गैरप्रकार सुरू आहेत. मात्र, सर्वात जास्त गैरप्रकार शिवाजीनगर पाटील इस्टेट परिसरातील उड्डाणपुलाखाली होत असल्याचे समोर आले आहे. या परिसरातील उड्डाणपुलाखाली काही स्थानिक भंगारवाल्यांनी दुकाने थाटली आहेत, तर जुगाराचे अड्डे सुरू केल्याचे दिसले. याठिकाणी बंद, गंजलेल्या गाड्यादेखील अनेक दिवसांपासून ठेवण्यात आल्या असून, अनधिकृत पार्किंगचा तर हैदोसच सुरू आहे. यामुळे परिसरातून जाणार्‍या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या सुमारास लुटालुटीचे प्रकार होण्याची शक्यता आहे.

धायरी परिसरात असलेल्या उड्डाणपुलाखाली सर्रास अनधिकृत पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी कोण वाहन पार्क करतंय, यासंदर्भात कोणालाही माहिती नाही. त्यामुळे सुरभिततेच्या दृष्टीकोनातून उड्डाणपूलाखाली होत असलेल्या पार्किंगवर तसेच येथे सुरू असलेल्या गोष्टींवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

स्वारगेट उड्डाणपुलाखाली नेऊन प्रवाशांची लूट

शहरातील अनेक उड्डाण पुलाखाली अनागोंदी कारभार सुरू आहेत. त्यात सततची वर्दळ असलेला स्वारगेट उड्डाणपूल देखील वाचलेला नाही. या परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना माहिती विचारण्याच्या बहाण्याने उड्डाणपुलाखाली नेऊन लुटले जात आहे; तसेच पाकीटमारही या उड्डाणपुलांच्या आडोशाने आपले हात साफ करून घेताना दिसत आहेत.