Fri, Jul 19, 2019 20:29होमपेज › Pune › ...तर धर्म कसा मानायचा : स्वामी अग्निवेश

...तर धर्म कसा मानायचा : स्वामी अग्निवेश

Published On: Sep 09 2018 12:46PM | Last Updated: Sep 09 2018 12:46PMपुणे : प्रतिनिधी

देव कुठल्या गोष्टीचे प्रतीक आहेत याचे उत्तर मला लहान पणापासून आजपर्यंत मिळाले नाही. धर्माच्या क्षेत्रात असा एक विभाग आहे जिथे आपल्याला काही करावे लागत नाही. भोंदू, पाखंडी आपल्यासाठी ते सर्व पूजा पाठ करतात. आपल्याला फक्त त्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. जेव्हा मला कळले की सृष्टीकर्ता एक आहे, तेव्हा मी मंदिरात जाणे सोडले.

श्वर आपल्या स्वता:मध्येच आहे, हे मला कळले. त्यामुळे माझा वेळ, पैसा वाचला. धर्माचे पालन करायला मला लहान पणापासून अनेक गोष्टी कराव्या लागल्या. जो धर्म आपल्याला आप-आपसात वाटत आहे त्याला आपण धर्म कसे म्हणावे, अशी परखड टीका ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी केली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 'हिंसा के खिलाफ, मानवता की और' मोहिमे अंतर्गत या परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बागवे, मिलिंद देशमुख, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते.

देशात मत मांडणे देशद्रोही ठरतंय
स्वामी अग्निवेश म्हणाले, या देशात संवादाची परंपरा राहिली आहे. मात्र, त्या लोकांनी सामोरा समोर बसून संवाद न करता डॉ. दाभोलकरांची हत्या केली. माणसा-माणसामध्ये मतभेद असणे वाईट नाही. त्यांच्या हो ला हो लावले नाही तर आपण देश द्रोही ठरतो. या देशात मत मांडणे आज देशद्रोह ठरतो आहे. देशद्रोहाचा उपयोग मतभेदाला मारण्यासाठी केला जात आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे देशद्रोह कसा? असा सवालही त्यांनी केला.

मानवाने तीन गोष्टी पाळायला हव्या
आपण सर्व नागरिक समान आहोत. जातीयवाद हे आजारपण आपण तयार केले आहे. आपल्याला जातीमुक्त समाज हवा. धर्माच्या ठेकेदारांनी माझ्यावर हल्ला केला. वेदांमध्ये मनुष्य धर्मच धर्म मानल्या गेला आहे. मानव धर्मच खरा हिंदू धर्म आहे. हे वैचारिक आंदोलन आहे. जर मानव असेल आपण तीन गोष्टी पाळल्या पाहिजे. प्रश्न विचारायची ताकद हवी, वाद-विवाद करता यायला हवे आणि मतभेद असायला हवे. तरच आपण मानव म्हटल्या जाऊ. हिंसेचे राजकारण करणाऱ्या विरुद्ध आपण लढायला हवे. सामाजिक न्यायला आपल मानून आपण लढायला हवे. सामाजिक आणि राजकीय एकता यासाठी कामी येईल. 

वाजपेयींना श्रद्धांजली वहायला गेल्यावर झाला हल्ला
स्वामी अग्निवेश म्हणाले, मी ज्या लोकांना ओळखत देखील नव्हतो त्यांनी माझ्यावर हल्ले केले. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वहायला गेलो तेव्हा देखील माझ्यावर हल्ला झाला. या मागे असणाऱ्या व्यक्तींना आपण ओळखले पाहिजे. हे दहशतवादाचे नवं-नवे रूप आहेत. देशातील सर्व लोकांमध्ये दहशतवादाचे भय आहे. प्रेम-करुणा आपण या समाजात जागवायला हवी. आपल्यामध्ये अंधश्रद्धा घुसली आहे का? हे आपण पाहायला हवे. संपूर्ण जगातील गोष्टींना पाहतो तेव्हा मला कळते की आपण घोर अंधकारात जगतो आहे. अंधश्रद्धेची गुलामी खूप वाईट असल्याचे ते म्हणाले.