Fri, Apr 26, 2019 15:41होमपेज › Pune › ‘स्वाभिमानी’ची साखर संकुलावर धडक

‘स्वाभिमानी’ची साखर संकुलावर धडक

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 1:18AMपुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर आणि दुधाला अनुदान मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून शुक्रवारी साखर संकुलावर मोर्चा काढून  वातावरण ढवळून काढले. अलका टॉकीज चौकातून निघालेल्या या   कैफियत मोर्चात  मोर्चामध्ये स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, अ‍ॅड. योगेश पांडे, राजेंद्र ढवाण पाटील, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जालिंदर पाटील, सावकार मदनाईक, सचिन नलावडे, माणिक कदम, प्रल्हाद इंगोले, गजानन बंगाळे यांच्यासह राज्यभरातील शेतकरी सहभागी झाले होते. पोलिसांनी साखर संकुल प्रवेशद्वाराच्या अलीकडेच मोर्चाला रोखले. त्यानंतर कृषी भवनसमोरील रस्त्यावर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडत सरकारच्या विरुध्द घोषणाबाजी केली.

शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून टनाला 1 हजार 150 रुपयांपर्यंत केलेली तोडणी वाहतूक खर्च कपात करून शेतकर्‍यांचे नुकसान केले आहे. टप्पेनिहाय अंतराची अंमलबजावणी तत्काळ करावी. अन्यथा यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा  खासदार राजू शेट्टी यांनी  साखर आयुक्‍त संभाजी कडू पाटील यांना दिला.कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम 20 जुलैपूर्वी 15 टक्के व्याजासह न दिल्यास 21 जुलै रोजी साखर आयुक्तालयात घुसणार आहे. त्यावेळी संबंधित कारखान्यांच्या महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे आदेश घेतल्याशिवाय आयुक्तालयातून हलणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

सहकारमंत्र्यांच्या कारखान्यांकडे 60 कोटी थकीत

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या तीन कारखान्यांकडे उसाच्या एफआरपीचे सुमारे 60 कोटी रुपये थकीत आहेत. दरोडेखोरांच्या हातात तुम्ही किल्ल्या दिल्या. ज्यांनी कारवाई करायची, तोच थकबाकीदार आहे. त्यामुळे प्रथम सहकारमंत्र्यांना थकीत एफआरपीची रक्‍कम शेतकर्‍यांना द्यायला सांगा, अशी मागणी   शेट्टी यांनी आयुक्तांकडे केली.

तर मुंबईचा दूध पुरवठा रोखणार

राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 27 रुपये घोषित केलेला असला तरी सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांकडून होणारी खरेदी सध्या 17 रुपये लिटरपर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या धर्तीवर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर लिटरला पाच रुपये थेट अनुदान सरकारने जमा करावे. अन्यथा 15 जुलैपासून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणार असल्याचा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.