Sun, Nov 18, 2018 18:12



होमपेज › Pune › पुण्यातील महिलेचा चिनी मांजाने गळा कापून मृत्यू 

पुण्यातील महिलेचा चिनी मांजाने गळा कापून मृत्यू 

Published On: Feb 11 2018 1:35PM | Last Updated: Feb 11 2018 2:11PM



पुणे प्रतिनिधी 

दुचाकीवरून जाताना महापालिकेजवळील शिवाजी पुलावर मांज्याने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा मुजूमदार असे मयत महिलेचे नाव आहे. 

सुवर्णा मुजुमदार या ‘सकाळ’ वृत्तसेवामध्ये जाहिरात आणि मार्केटिंग विभागात काम करत होत्या. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुवर्णा मुजूमदार या महापालिका भवनाजवळील शिवाजी पुलावरून त्यांच्या दुचाकीने जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळला गेला आणि त्यांचा गळा कापला गेला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ शेजारीच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पतंग उडविण्यासाठी अत्यंत घातक असा मांजा वापरण्यास बंदी आहे. मात्र तरीही शहरातील उपनगरांमध्ये मागील अनेक दिवसांपासून सर्रासपणे मांजा वापरला जात आहे. यामुळे मागील काही दिवसांपुर्वी विश्रांतवाडी येथील एका तरुणाचा चेहरा कापला गेला होता. त्यानंतर सुवर्णा मुजुमदार यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याचा गांभीर्याने विचार केला जाणे आवश्यक आहे. तर याप्रकरणी मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.