Tue, Jul 16, 2019 10:17होमपेज › Pune › पाच दिवसांत जलपर्णी न काढल्यास निलंबन

पाच दिवसांत जलपर्णी न काढल्यास निलंबन

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 1:02AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्र जलपर्णीने व्यापल्याने नदीकाठचे रहिवाशी डासांच्या प्रादुर्भावाने हैराण झाले आहेत. त्रस्त नागरिकांच्या त्या संदर्भात वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगवीस भेट देऊन पवना व मुळा नदीची पाहणी केली. पात्रातील जलपर्णी येत्या 5 दिवसांमध्ये न हटविल्यास संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा सक्त इशारा त्यांनी दिला आहे. जलपर्णी अधिक वेगाने काढण्यासाठी ठेकेदाराने नवीन तात्काळ उपलब्ध करून दिले आहे. 

जलपर्णीमुळे नदीकाठचे रहिवासी हैराण असल्याबद्दलचे वृत्त पुढारीने सतत प्रसिद्ध करत याप्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल अखेर आयुक्तांनी घेतली. तसेच भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे व इतर नगरसेवकांनी वाढत्या डासांच्या प्रादुर्भावासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे अखेर आयुक्तांनी सांगवीस भेट देऊन पवना व मूळा नदीची पाहणी केली. या वेळी नगरसेवक ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मनोज लोणकर, तसेच, जवाहर ढोरे, गणेश ढोरे, विजय ढोरे, हिरेन सोनवणे, शिवलिंग किनगे, आशा गायकवाड, राज सोमवंशी आणि मधुबन कॉलनीतील नागरिक व अधिकारी उपस्थित होते. 

आयुक्तांनी दोन्ही नद्यातील साचलेल्या जलपर्णीची पाहणी केली. पवना नदीच्या तुलनेत मुळा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्याचे दिसून आले. दापोडीत हॅरीस पुलाला समांतर पुलाचे काम सुरू असल्याने पात्र अडविण्यात आले आहे. त्यामुळे जलपर्णीसह पाणी पुढे वाहत नाही. त्यामुळे पुलाजवळील बंधारा काढून टाकून पाणी प्रवाहीत करण्याचा सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच, येत्या 5 दिवसांमध्ये सर्व जलपर्णी काढून नदी पात्र स्वच्छ न केल्यास अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा दिला आहे. त्यानंतर तात्काळ मुळा नदीत ठेकेदाराने  नवे यंत्र उपलब्ध करून दिले असून, जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 

संध्याकाळच्या पाहणीत आयुक्तांनी अनुभवला डासांचा त्रास

सांगवीत डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात असून, संध्याकाळनंतर रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे. अशा तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. आयुक्तांनी सायंकाळच्या वेळीच सांगवीस भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनाही डासांचा होत असलेल्या त्रासाचा अनुभव आला. परिणामी, तक्रारीचे गांभीर्य त्यांना उमगले आणि त्यांनी जलपर्णी हटविण्याचे तात्काळ आदेश दिले.