Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Pune › महिला पोलिस अधिकार्‍याला निलंबित करा

महिला पोलिस अधिकार्‍याला निलंबित करा

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:40AM

बुकमार्क करा

पुणे : देवेंद्र जैन 

कार्ला येथील एकवीरा देवीच्या कळस चोरीप्रकरणी, तसेच मंदिराच्या सहखजिनदाराला  समाजातून वाळीत टाकल्याप्रकरणीच्या तपासात जाणूनबुजून निष्काळजीपणा करणार्‍या लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक साधना पाटील यांना त्वरित निलंबित करावे व तपास सीआयडीकडे देण्याची मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत  केली. 

पुणे ग्रामीण पोलिस दलातील लोणावळा ग्रामीण पोलिस स्थानकामध्ये नेमणुकीस असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील या सूडबुद्धीने कशा प्रकारे एकवीरा देवीच्या चोरीस गेलेल्या कळसाबाबत तपास करीत आहेत, याची माहिती देताना तरे यांनी सांगितले, की एकवीरा देवीचा कळस दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी चोरीला गेला. लाखो कोळी व आगरी समाजाच्या भावनांंशी संबंधित विषय असताना सदर तपास साधना पाटील या जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने करीत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल करीत आहेत. अथवा  पोलिस दल कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहे, हे श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने आम्हाला कळणे गरजेचे आहे. 

चोरीच्या घटनेच्या आदल्या दिवशी तेेथील सीसीटीव्हीच्या दिशा राजू देवकर याने बदलल्या होत्या व चोरी झाल्यावर पूर्ववत करण्यात आल्या, असा आरोप तरे यांनी केला.  देवकर याला पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. तसेच या चोरीमध्ये गणपत पडवळ, मिलिंद बोत्रे, मधुकर पडवळ व दत्तात्रय पडवळ हेसुद्धा सामील असल्याचे आमचे ठाम मत आहे, असे तरे यांनी म्हटले आहे.  चोरी झाल्यावर वरील सर्वांनी एकत्र येत बाजार बंद केला व कळसाबाबत वाच्यता न करता कार्यरत असलेली कार्यकारिणी बरखास्त करावी,  अशी मागणी केली. यावरून त्यांना मंदिराच्या कळसापेक्षा ट्रस्ट ताब्यात घेणे महत्त्वाचे आहे, असेही तरे म्हणाले. चोरीबाबत अशोक पडवळ या व्यक्तीने आवाज उठवला असता, वरील सर्वांनी त्याला बेदम मारहाण केली. पडवळ याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली; पण साधना पाटील यांनी एफआयआर दाखल केला नाही व प्रकरण देवाण-घेवाण करून मिटवले, असा आरोपही तरे यांनी केला. 

वरील सर्वांनी ट्रस्टचे अधिकृत फलक बेकायदेशीरपणे काढले. त्याबाबत व मंदिराच्या सुरक्षेबाबत तहसीलदारांनी बैठक फक्त आमच्या समाधानासाठी घेतली. त्यातून आजपर्यंत काहीही निष्पन्न झाले नाही, असेही तरे यांचे म्हणणे आहे. ट्रस्टच्या सहखजिनदारांना पिस्तुलाच्या धाकाने पळून नेऊन कोंडून ठेवले व  कोर्‍या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्याबाबत पोलिसांकडे  लेखी तक्रार केली; परंतु साधना पाटील यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे तरे यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्त्विात असताना विलास कुटेंवर वरील सर्वांनी  सामाजिक बहिष्कार टाकला.

याप्रकरणातही साधना पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना कारवाई केली नाही, असे तरे यांचे म्हणणे आहे. तरे यांच्या म्हणणण्यानुसार, या सर्व प्रकारांमुळे कोळी व आगरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. चोरीचा छडा त्वरित लावण्यात यावा, तसेच आमच्या भावनांना कोणी हात घालत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. तसेच एपीआय साधना पाटील यांना त्वरित हटवून तपास सीआयडीकडे  सोपवावा.  कार्यक्षम अधिकार्‍यांकडून तपास करण्यात यावा, अन्यथा आम्ही सर्व कोळी व आगरी समाज मोर्चा काढणार आहोत.