Sat, Nov 17, 2018 18:46होमपेज › Pune › पोलिस महासंचालक, आयुक्‍तांना निलंबित करा : विखे -पाटील 

पोलिस महासंचालक, आयुक्‍तांना निलंबित करा : विखे -पाटील 

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 1:05AMपुणे ः

साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि पुणे पोलिस आयुक्त यांना निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने विखे पाटील गुरुवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही मागणी केली. या वेळी राज्य सरकारवर तोफ डागताना विखे पाटील म्हणाले, साहित्यिक,  विचारवंतांच्या अटकेसंदर्भात या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला अनुकूल अशीच भूमिका मांडली होती. सरकारची भूमिका मांडायला हे पोलिस अधिकारी सरकारचे प्रवक्ते आहेत का, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. अधिकार्‍यांनी आपल्या मर्यादेत राहवे, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. 

हा सर्व प्रकार सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि पुणे पोलिस आयुक्त यांना निलंबित करावे.