राजुरी येथे संशयित कोरोना रुग्ण

Last Updated: Mar 29 2020 11:15PM
Responsive image


आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

निमोनिया झालेल्या राजुरी (ता. जुन्नर) येथील एका रुग्णाला संशयित कोरोना रुग्ण म्हणून पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल केले असून, तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित आहे का हे समजेल, अशी माहिती डॉ. उमेश घोडे यांनी दिली.

दरम्यान, हा रुग्ण सापडल्यामुळे आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आळे, बेल्हे, राजुरी, आणे गावासह परिसरातल्या वाड्य- वस्त्यांना ‘बफर झोन’ घोषित करण्यात येईल. त्याची तयारी म्हणून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.

राजुरी (ता. जुन्नर) येथे मुंबईहून तीन दिवसांपूर्वी आलेल्या एका व्यक्‍तीला सर्दी, खोकल्याचा  त्रास होऊ लागल्यानंतर त्याने राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्याला निमोनिया असल्याचे दिसून येताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील नायडू रुग्णालयात संशयित कोरोना रुग्ण म्हणून तपासणीसाठी हलविण्यात आले. त्या रुग्णाचा तपासणी अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होईल, त्यांनतर कोरोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोडे यांनी सांगितले. ते म्हणाले, हा व्यक्‍ती ज्यांच्या संपर्कात आला त्यांची तपासणीही करण्यात येईल.

दरम्यान परिसर ‘बफर झोन’ जाहीर होईल म्हणून आळेफाटा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. आळे, राजुरी, बेल्हे, आणे परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परिसरात रस्त्यावर कोणतीही व्यक्‍ती आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.articleId: "185547", img: "Article image URL", tags: "Suspected corona patient at Rajouri",