Tue, Mar 26, 2019 01:43होमपेज › Pune › बलात्कार प्रकरणातील संशयित मोकाटच!

बलात्कार प्रकरणातील संशयित मोकाटच!

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:43AMपुणे  : देवेंद्र जैन

कॅडबरीचे आमिष दाखवून नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेला 11 दिवस लोटूनही  नराधमाला अटक करण्याचे धैर्य पोलिस दाखवतच नाही. पण त्यापेक्षाही आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे  वरिष्ठ अधिकारी या घटनेपासून  अनभिज्ञच असल्याचे समोर आले आहे. 

समर्थ पोलिस स्थानकामध्ये दि. 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा. या पीडितेच्या आईने तक्रार दिली आहे.  त्यात म्हटले की,  शेजारी राहणार्‍या एकाने पीडितेला कॅडबरीचे व खाऊचे आमिष दाखवत  10 रुपये दिले व तिला घरात नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितावर कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडिता ही मागासवर्गीय असल्याने संशयितावर अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावणे गरजेेचे होते; परंतु, तसे झाले नाही. यासंदर्भात पीडितेच्या कुटुंबीयांनी अनुसूचित आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये संशयितावर अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर  पीडिता मागासवर्गीय असल्याबाबतचा कायदेशीर पुरावा दिल्यानंतरसुद्धा पोलिस संशयिताला मदत करत असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला.

पोलिस महासंचालक दर्जाच्या एका अधिकार्‍याने, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार, कुठल्याही अल्पवयीन मुलीची बलात्काराची तक्रार ही पीडितेच्या घरी जाऊन घेणे गरजेचे आहे व सरकारी रुग्णालयात तिची त्वरीत तपासणी करावी, तसेच दुसर्‍याच दिवशी न्यायालयात 164 कलम नुसार तिचा जवाब नोंदवणे गरजेचे आहे. यापूर्वीही मागासवर्गीय जातीचा पुरावा दिल्या नंतर सुद्धा कोरेगाव पार्क पोलिस स्थानकामध्ये एका उच्च शिक्षित मागासवर्गीय समाजातील बलात्कार पीडितत महिलेला तिच्या तक्रारीमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कलम पोलिसांनी दहा महिन्यांनंतर कलम लावले व ती मागासवर्गीय आहे की नाही  याचा तपास तिच्या गावात जाऊन शाळा-कॉलेजमध्ये केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

लहान मुलीवरील बलात्कारा सारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिस कसे वागतात हे या घटनेवरून पुढे आले आहे. तसेच सदर गुन्ह्यातील अटक आरोपीची माहिती प्रसारमाध्यमांना का देण्यात आली नाही, हे पोलिसांनी सांगणे गरजेचे आहे व मागासवर्गीय असताना आयोगाच्या पायर्‍या चढाव्या लागतात हे दुर्दैव आहे, अशी चर्चा सुरू आहे. 

वरिष्ठ अधिकारी म्हणतात, ‘बातमी कशाला करता?’ 

याबाबत तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र माहितेे यांना चार दिवस ‘पुढारी’प्रतिनिधीने संपर्क केला असता, आयोगाच्या आदेशावरून सदर गुन्ह्यामध्ये आता अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे सुरू आहे, तसेच गुन्हा घडून बरेच दिवस झाले आहे, कशाला बातमी करता? असा उलट प्रश्न त्यांनी ‘पुढारी’ प्रतिनिधीला केला. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून ‘पुढारी’ने पाठपुरावा सुरू ठेवला व अतिरिक्त पोलिस आयुक्त सेनगावकर यांना दि. 14 फेब्रुवारीला संपर्क केला,.

त्यावेळी सदर गुन्ह्याची माहिती घेऊन कळवतो असे सांगितले. आज परत त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांना अद्याप माहिती मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर  प्रभारी पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांना संपर्क साधला.  त्यांना घटडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी संपूर्ण माहिती देतो असे सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत तेही माहिती देऊ शकले नाहीत.