Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Pune › वृक्ष लागवडीसाठी ‘जीपीएस’द्वारे पाहणी

वृक्ष लागवडीसाठी ‘जीपीएस’द्वारे पाहणी

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:50AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पावसाळ्यात 60 हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. त्यासाठी ठिकाणे निश्‍चित करण्यासाठी जीपीएस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक महासंघ, हाउसिंग सोसायट्या, सार्वजनिक मंडळांचा सहभाग घेण्यात येणार आहे, असा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सोमवारी (दि.25) झालेल्या सभेत घेण्यात आला.
पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त श्रावण हर्डीकर होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, समिती सदस्य शीतल शिंदे, तुषार हिंगे, तुषार कामठे, संतोष लोंढे, नवनाथ जगताप, श्याम लांडे, संभाजी बारणे, साधना मळेकर, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते.

शहरातील वृक्षांची गणना जीपीएसद्वारे केली जाणार आहे. हे काम मुंबईच्या टेरॉकॉन कंपनीतर्फे जानेवारी महिन्यात सुरू झाले असून, ते दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी 6 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गतच नव्याने वृक्ष लागवडीबाबत ठिकाणे निश्‍चित केले जाणार आहेत. सध्या 14 हजार झाडे लावण्यासाठी चार ठिकाणी तत्वत: ठरविण्यात आली आहेत. पक्षी व प्राण्यांसाठी अधिक प्रकाराचे खाद्य उपलब्ध व्हावे म्हणून वेगवेगळ्या भारतीय जातीच्या फळांची झाडे लावण्यात येणार आहेत.जीपीएसद्वारे वृक्ष मोजणीमध्ये शहरातील सर्व वृक्षांची मोजणी केली जाणार आहे. त्यात वृक्षांची उंची, बुंधा, त्याची जात, वयोमान आदीची नोंद केली जाणार आहे. ही संपूर्ण माहिती नागरिकांना पालिका संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

शहरात वृक्षमित्रांची संख्या मोठी आहे. मात्र, ‘वृक्ष रक्षका’ची गरज असल्याचे मत सदस्यांनी सभेत व्यक्त केली. लावलेले झाड मोठे होईपर्यंत त्याचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी. त्यासाठी हाउसिंग सोसायट्या, स्वयंसेवी संस्था व सार्वजनिक मंडळांची मदत घेतली जात आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन समितीने केले आहे. नागरिकांनी झाडे लावण्याची ठिकाणी सूचवावीत. शहरात वृक्ष संवर्धन जनजागृतीसाठी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, एक झाड तोडल्यानंतर त्यानंतर नव्या वृक्षाची लागवड झाली पाहिजे. त्यासाठी उद्यान विभागासह समितीने दक्ष राहिले पाहिजे. त्याबाबत उद्यान विभागाने कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली. 

वादळी पावसामुळे वाकलेली झाडे काढण्याची सूचना

पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारी (दि.21) झालेल्या वादळी पावसात अनेक झाडे वाकली आहेत. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. अशी धोकादायक झाडे अंगावर पडून मुंबई शहरात 3 ते 4 जणांचा नाहक मृत्यू झाला आहे. असे प्रकार शहरात घडू नये म्हणून, उद्यान विभागाने शनिवारपर्यंत (दि.30) ती झाडे काढून टाकावीत, असा सूचना समिती सदस्य शीतल शिंदे व तुषार हिंगे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. त्यानंतर सदस्य त्या कामाची पाहणी करणार आहेत.