Sun, Apr 21, 2019 04:03होमपेज › Pune › गहुंजे ते उर्से सर्व्हे सुरू

गहुंजे ते उर्से सर्व्हे सुरू

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी  

मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडत आहेत. या प्रकल्पाच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी हायपरलूपच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 

पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आणणार्‍या या तंत्रज्ञानाची लवकरच पुण्यात चाचणी होणार आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अभियंत्यांचे पथक पुण्यात दाखल झाले असून, प्रत्यक्ष सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे. गहुंजे ते उर्से टोलनाका असा पंधरा किलोमीटर लांबीचा आणि 24 मीटर रुंदीचा ट्रायल ट्रॅक बनविण्यात येणार आहे.  दोन वर्षात हा ट्रॅक पूर्ण करण्याचा संकल्प पुणे महानगर प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केल्यानंतर या कामाने गती घेतली आहे. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची व्यावहारिकता पडताळण्यासाठी नुकताच एक अभ्यासही करण्यात आला आहे. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक व अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांची सर्वतोपरी मदत लाभत आहे.

या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किमीचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी 70 टक्के सामग्री आणि उपकरणे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ शकणार आहे. या 100 टक्के इलेक्ट्रिक व कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून, वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका, असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होतील, असा दावा पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.