Tue, Mar 26, 2019 02:14होमपेज › Pune › पार्किंग धोरणासंदर्भातएजन्सीमार्फत सर्वेक्षण 

पार्किंग धोरणासंदर्भातएजन्सीमार्फत सर्वेक्षण 

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:27AM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड शहराच्या पार्किंग धोरणाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. एजन्सीद्वारे शहरातील पार्किंग झोन निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार शहरात ‘पार्किंग झोन’ धोरण राबविण्याचा विचार पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असल्याचे अधिकार्‍यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

‘पार्किंग झोन धोरणाविनाच ‘स्मार्ट सिटी’ची धाव; महापालिकेस 35 वर्षे उलटूनही प्रशासन स्तुतच,’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने सोमवारी (दि.15) छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. या संदर्भात माहिती महापालिका प्रशासन काम करीत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.  

खासगी एजन्सीद्वारे सन 2017 मध्ये सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण वर्षभर सुरू होते. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार (डीपी) कोठे, कसे पार्किंग क्षेत्र व नो पार्किंग क्षेत्र असेल ते निश्‍चित केले आहे. मुख्य व अंतर्गत रस्ते, बाजारपेठ, चौक, निवासी क्षेत्र आदी ठिकाणचे मोफत व सशुल्क असे वेगवेगळे धोरण आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासाठी जागतिक बँकेची मदत घेण्यात येत आहे. सर्वेक्षणाची उपलब्ध माहिती जागतिक बॅकेच्या प्रतिनिधींना वेळोवेळी देण्यात आली आहे. त्यांनी पाहणी करून केलेल्या सूचनांनुसार त्यात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. 
‘पार्किंग झोन’संदर्भातील अहवालाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सादरीकरणही झाले आहे. अहवालास अंतिम स्वरूप दिल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत मांडला जाईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने  प्रत्यक्ष अंमलबजावणी
‘पार्किंग झोन’ धोरण ठरविण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. ‘हॉकर्स झोन’ व ‘पार्किंग झोन’ हे एकमेकांना पूरक असल्याने त्या दोन्ही धोरणांची एकाच वेळी अंमलबाजवणी करण्याचे नियोजन आहे. ‘पार्किंग झोन’मुळे शहरातील वाहतुकीस शिस्त लागून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ‘पार्किंग झोन’ धोरण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून सभेची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष ‘पार्किंग झोन’ धोरणाची शहरभरात अंमलबजावणी केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.