Wed, Nov 13, 2019 12:25होमपेज › Pune › जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 1:04AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात  दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दारिद्—यरेषेखालील किंवा केशरी शिधापत्रिकाधारक असल्यास या ठिकाणी मोफत उपचार केले जातात; अन्यथा तीनशे रुपये शुल्क आकारले जाते. महिन्याला विविध प्रकारच्या 35 शस्त्रक्रिया या विभागात होत आहेत. कान-नाक-घशाशी संबंधित कॅन्सरची प्राथमिक तपासणीही केली जाते. 

जिल्हा रुग्णालयात कान-नाक व घशाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी 2005 -2006 पासून हा विभाग कार्यरत आहे. सध्या या विभागात दहा खाटांची सुविधा आहे. पूर्वी या विभागाला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र अत्याधुनिक सोयी-सुविधा व विविध आजारांवर उपचार होत असल्याने या ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढत आहे. या विभागात  दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया, श्रवणक्षमता चाचणी, वाचादोष उपचार, टॉन्सील, दुभंगलेले ओठ, टाळू, नाकातील विविध शस्त्रक्रिया, थॉयरॉईडसह विविध ग्रंथींवरील शस्त्रक्रिया केली जाते. कान-नाक-घशाशी संबंधित कॅन्सरवरची प्राथमिक तपासणी केली जाते, त्याबाबत मार्गदर्शन व उपचाराचीही सोय आहे. 

या विभागात आंतररुग्ण व बाह्यरुग्ण असे दोन विभाग आहेत. दिवसाला सुमारे 80 ते 100 रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. थॉयरॉईड व इतर ग्रंथींशी संबंधित महिन्याकाठी दोन शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अनेकांना जबड्याचा, कानाचा व घशाचा कॅन्सर होत आहे. या विभागात याबाबत प्राथमिक तपासणी केली जाते. कॅन्सर झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या रुग्णावर उपलब्ध सामग्रीद्वारे उपचार व मार्गदर्शन केले जाते.

कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्यास पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविले जाते. महिन्याला दोन रुग्ण कॅन्सरचे आढळत आहेत. खासगी रुग्णालयात दुर्बिणीद्वारे कानाची शस्त्रक्रिया करण्याचा खर्च अधिक आहे; मात्र जिल्हा रुग्णालयात दारिद्—यरेषेखाली किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास मोफत उपचार केले जातात. इतर रुग्णांना नाममात्र तीनशे रुपये फी आकारली जाते. त्यामुळे येथे येणार्‍या रुग्णांना ते सोयीचे होत आहे. या विभागात पुरेसे कर्मचारी आहेत. यामध्ये दोन कान-नाक-घसातज्ज्ञ, एक श्रवणक्षमता चाचणीतज्ज्ञ, एक वाचादोषतज्ज्ञ आहेत. 

या विभागात दुर्बिणीद्वारे कानाची शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कानाचा खराब पडदा बदलणे, हाड कुजले असल्यास ते स्वच्छ करून बदलणे, हाडाची साखळी खराब झाली असल्यास बदलणे आदी शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णांना दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची  विश्‍वासार्हता नव्हती, त्यामुळे काही रुग्ण अशा शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे पाठ फिरवत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

 

Tags : Pimpri, Pimpri news, district hospital, telescope, Surgery,