Tue, Aug 20, 2019 04:16होमपेज › Pune › शिक्षणमंत्री तावडे यांनी ‘ट्युशन’ लावायला हवी : सुप्रिया सुळे

शिक्षणमंत्री तावडे यांनी ‘ट्युशन’ लावायला हवी : सुप्रिया सुळे

Published On: May 29 2018 1:35AM | Last Updated: May 29 2018 12:47AMपुणे  : प्रतिनिधी 

एका बाजूला सरकार एकही मराठी शाळा बंद करणार नाही, असे  सांगत आहे. तर दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येचे कारण देत शाळा समायोजित करण्यात येत आहेत. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत पाठविणे म्हणजे शाळा बंद करणेच असते. समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत आहेत. त्यामुळे शाळा बंद धोरणावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ’ट्युशन’ लावायला हवी, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

सरकारच्या पटसंख्येच्या अभावी तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयावर खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत  तावडे यांच्यावर टीका केली. यावेळी माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोटे बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र, हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही सुळे यांनी केली. तसेच मी आणि पवारसाहेब कधी खोट बोललो हे तावडेंनी दाखवावे, असे आव्हान देखील त्यांनी तावडेंना  दिले.  

शिक्षण खात्यात विचित्र विनोद

शिक्षणमंत्री धांदात खोटे दावे करत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र 17 व्या स्थानावरुन तिसर्‍या  स्थानावर पोहचल्याचा दावा शिक्षणमंत्री करत आहेत. पण हा दावा नेमका कोणत्या अहवालावर आधारीत आहे, असा प्रश्‍न खासदार सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. एखाद्या अदिवासी पाड्यावर 3 मुले शिकत असतील आणि तुम्ही जर पटसंख्येच्या आधारे शाळा बंद करणार असाल, तर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्काच काय, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिक्षण खात्यात गेल्या तीन-चार वर्षात विचित्र ‘विनोद’ सुरू असून शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

अवांतर वाचनाच्या नावाखाली मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार

सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत अवांतर वाचनासाठी देशभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांना पुस्तके देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष  2017-18 मध्ये चाचा चौधरी आणि मोदी असे चित्ररूपी पुस्तकही देण्यात आले आहे.  या पुस्तकांमध्ये चाचा चौधरी ही व्यक्तिरेखा मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देत आहे. या पुस्तकाच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी नोंदवला.

कोणत्या निकषांवर शाळा बंद करता?

सरकारने गुणवत्ता आणि कमी पटसंख्येचे कारण देत ज्या शाळा समायोजित केल्याचे सांगितले त्याच शाळांना शिक्षण विभागाने अ दर्जा दिला. यामध्ये पुण्यातील 8 तर अहमदनगर जिल्हातील 10 शाळा आहेत. केवळ दोन जिल्ह्यातील ही परिस्थिती आहे, तर संपूर्ण राज्यातील पाहणी केल्यास कोणत्या निकषांवर शाळा बंद केल्या, असा प्रश्‍न उपस्थित होतो.