दौंड (पुणे): पुढारी ऑनलाईन
भाजपचे लोक आज उपोषण करीत आहेत. आज एकादशी आहेच, लोक आज असाही उपवास करतातच. भाजपच्या लोकांचे हे उपोषण ढोंगी असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला. लिंबू सरबत पिऊन कोणते उपोषण होते का? असा सवाल करत उपोषण सोडा आणि थोडं काम करा, असा सल्लाही त्यांनी भाजप सरकारला दिला. दौंड येथील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत त्या बोलत होत्या.
संसदेचे कामकाज चालत नाही म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषणाला बसत असतील तर ही गंभीर गोष्ट असल्याचे मत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. बहुमत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषणाला बसावे लागत असेल तर आजची तारीख इतिहासात नोंदली जाईल, असेही ते म्हणाले.
भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. भाजपला माहिती आहे की ते पुढच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षात असणार त्यामुळे आतापासूनच आंदोलनांची सवय लावून घेत असल्याचा टोलाही मुंडे यांनी लगावला.
देशाचे पंतप्रधान व भाजपचे खासदार आपआपल्या मतदारसंघात उपोषणाला बसले आहेत. भाजप विरोधी पक्षात असताना तीन महिने अधिवेशन चालले नव्हते तेव्हा गप्प का होता? असा सवालही मुंडेंनी भाजपाला केला.
Tags : National Congress Party, Supriya Sule, Dhananjay Munde, Sharad Pawar, BJP. Fast Protest