होमपेज › Pune › दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आधार सक्‍ती रद्द

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आधार सक्‍ती रद्द

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिव्यांगांना आधार कार्डची सत्यप्रत सादर करणे सक्‍तीचे होते. पण आता ही अट सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना आता आधार कार्ड सादर करणे आवश्यक नसून रहिवासी पुरावा म्हणून इतर कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात जिल्हा रुग्णालये व इतर रुग्णालयांद्वारे सन 2012 पासून दिव्यांगांना ‘सॉफ्टवेअर अ‍ॅसेसमेंट ऑफ डिसॅबिलिटी महाराष्ट्र’ (एसएडीएम) या संगणक प्रणालीद्वारे अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून अन्य पुराव्यासोबत आधार ओळख कागदपत्र सादर करणे सध्या बंधनकारक आहे. 

पण आधारसक्‍ती केल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत होत्या.   सध्या दिव्यांगांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्ह्याचा रहिवासी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, बँक पासबूक, पॅनकार्ड, पासपोर्ट, लाईट, टेलिफोन बिल ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र, निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने दिलेले प्रमाणपत्र तसेच आधार ओळखपत्राची सत्यप्रत सादर करावी लागते. पण आता आधारकार्ड वगळून यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर केले तरी आता चालणार आहे.