होमपेज › Pune › रस्त्यावर  अवतरली अंधश्रद्धा!

रस्त्यावर  अवतरली अंधश्रद्धा!

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:59AM

बुकमार्क करा

चाकण : वार्ताहर

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून अजूनही अनेक मंडळी भूतपिशाच्च असल्या भ्रामक कल्पनांमध्ये अडकून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. याच मानसिकतेतून भुताची पैदास होऊन त्यावर उपाय म्हणून अंगारा, धुपारा, उतारा या गोष्टींचे अवडंबर आजही माजलेलेच आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील आंबेठाण चौकात याचा प्रत्यय प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला येत आहे. हळद, कुंकू, लिंबू, मिरच्या आदींचे उतारे येथील चौकात आणून टाकण्याचे प्रकार सुरू आहेत.  

रविवारी (दि. 3) मार्गशिर्ष पौर्णिमा होती. त्यामुळे असे पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौकात रविवारी (दि. 3) सकाळी ‘सिग्नल’जवळ एक भलामोठा हळद-कुंकू, लिंबू, मिरच्यांचा उतारा टाकल्याचे निदर्शनास आले. चौकात रस्त्यावर मधोमध ठेवलेल्या या उतार्‍याला न ओलांडता बाजूने जाणे अनेकांनी पसंत केले. दुचाकीचालकांनी उतार्‍यास बगल देत दुसर्‍या बाजूने जाण्यास प्राधान्य दिले़.

अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या भोळ्याभाबड्यांना फसवून करणी, जादूटोणा, मंत्र-तंत्र, उतारे करायला भाग पाडणारे भोंदू बुवा-बाबा आणि मांत्रिक आजही छुप्या पद्धतीने कार्यरत असून, नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आंबेठाण चौकात रहदारी वाढल्यानंतर दुपारी हा उतारा काही अवजड वाहनांखाली चिरडून संपूर्ण चौकात पसरला. येथील चौकात प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला असे मोठमोठे उतारे आणून टाकले जात असल्याचे या चौकात वाहतूक नियमनासाठी नेमलेले ट्राफिक वॉर्डन विशाल हातेकर, उमेश शितोळे, ब्रम्हानंद साठे आदींनी सांगितले.