Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Pune › सुपरस्पेशालिटी सामान्यांच्या आवाक्याबाहेर

सुपरस्पेशालिटी सामान्यांच्या आवाक्याबाहेर

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 11:42PM

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

लवकरात लवकर निदान करून उपचार करणार्‍या सुपरस्पेशालिटी (अतिविशेषोपचार) या वैद्यकीय सेवांचा लाखो रुपयांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे गरीब रुग्णांना त्या सेवा एक तर मिळत नाहीत किंवा त्यासाठी प्रचंड रक्कम मोजावी लागत आहे. मोठ्या सरकारी रुग्णालयांत या तज्ज्ञांची व साधनांची संख्या फार कमी आहे. 

वैद्यकीय क्षेत्रात जस-जसे नवीन शोध होऊ लागले तसा सुपरस्पेशालिटी या शाखेचा उदय होऊ लागला. गेल्या 20 ते 25 वर्षांत ही शाखा वाढू लागली. एखाद्या स्वतंत्र अवयवाशी संबंधित गुंतागुंतीचे उपचार करण्यासाठी आधुनिक तंत्राचा आधार घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार केले जातात, त्याला सर्वसाधारणपणे सुपरस्पेशालिटी समजतात. एखाद्या विशिष्ठ अवयवांचाच उपचार करणारा डॉक्टर म्हणजे सुपरस्पेशालिस्ट होय. यामुळे फिजिशियन आणि शल्यचिकित्सक (जनरल सर्जन) यांची रुग्ण उपचारांची भूमिका कमी होऊ लागली. कारण त्याआधी हेच तज्ज्ञ सर्व अवयवांचे वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया करत होते.

अतिविशेषोपचारांच्या तज्ज्ञांचे शुल्क  (ओपीडी चार्जेस), तपासण्या आणि उपचारांचे शुल्क हे स्पेशालिस्टच्या (जनरल सर्जन/फिजिशियनकडून केलेले उपचार) तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. खासगी रुग्णालयांत या उपचारांचे दर गगनाला भिडलेले आहेत. धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात हे उपचार करणे आवश्यक आहे; पण काही डॉक्टर किंवा रुग्णालये या उपचारांच्या बिलावर सूट देत नाहीत. म्हणून अनेक रुग्णांना त्यापासून एकतर वंचित राहावे लागते किंवा उसणे अथवा व्याजाने पैसे घेऊन उपचार घेणे भाग पडते, ही वस्तुस्थिती आहे.

सुपरस्पेशालिटी उपचार हे तंत्रज्ञान आणि विशेष तज्ज्ञ असल्यामुळे महागच असतात. त्यात धर्मादाय रुग्णालयांनी सर्वांना सूट देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाने प्राथमिक आणि द्वितीय आरोग्य सेवा जर बळकट केली तर हे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या कमी होईल, असे मत आरोग्य विषयाचे अभ्यासक डॉ. अभिजित मोरे यांनी व्यक्त केले. 

हे उपचार येतात सुपरस्पेशालिटीमध्ये

मेंदूविषयक (न्युरोलॉजिकल), हृदयविषयक (कार्डिओलॉजी), मूत्रविकार शस्त्रक्रिया (युरोसर्जरी), आतडेविषयक उपचार (गॅस्ट्रोइंटेस्टायनल), क्रिटिकल केअर, कॅन्सरविषयक (ऑनको), बालरोग (पेडियाट्रिक), संधिवात (हृमेटॉलॉजी), किडनीविषयक (नेफ्रोलॉजी), अनुशक्तीविषयक उपचार (न्युक्लिअर मेडिसीन), रक्त गुणधर्मविषयक (हिमॅटॉलॉजी) आदींचा समावेश होतो; तर क्ष-किरण तपासण्यांमध्ये पेट स्कॅन, डीटीपीए, डीएसए आदींचा समावेश सुपरस्पेशालिटीमध्ये होतो.