Tue, Jul 23, 2019 19:21होमपेज › Pune › ‘सनबर्न’ महोत्सवासाठी सरकारच्या पायघड्या का?

‘सनबर्न’ महोत्सवासाठी सरकारच्या पायघड्या का?

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:34AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

गोव्यातून हाकलून लावलेला सनबर्न महोत्सव संताची भूमी असलेल्या पुण्यात घेण्याचा घाट घातला जात आहे. मोशी, केसनंद आणि वाघोली येथे विरोध झाल्यानंतर बावधन आणि लवळे गावच्या सीमेवर असलेल्या ‘ऑक्सफर्ड गोल्फ क्लब’च्या जागेवर घेण्याचा प्रयत्न आयोजक करत आहेत. मात्र, सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांपुढे सरकार पायघड्या का घालत आहे, असा सवाल बावधन, लवळे येथील ग्रामस्थ आणि हिंदू जनजागृती समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

सनबर्न महोत्सव हा 28 ते 31 डिसेंबर या दरम्यान गेल्यावर्षी केसनंद येथे घेण्यात आला होता. यावेळी महोत्सवाला विरोध झाल्यानंतरही शेवटच्या क्षणी शासनाने परवानगी दिली होती. यंदाच्या महोत्सवामध्ये राज्य सरकारचा पर्यटन विकास महामंडळ भागीदार आहे. यंदा सुरुवातीला महोत्सवासाठी आयोजकांनी मोशी येथील जागा निश्‍चित केली होती. मात्र, त्याठिकाणी नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे पुन्हा केसनंद येथील गेल्यावर्षीच्या जागेवर घेण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, वनविभागाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर वाघोलीतील जागेचा शोध घेण्यात आला. मात्र, येथेही डाळ शिजली नाही. त्यामुळे लोहगाव येथे जागेची चाचपणी करण्यात आली. परंतु येथे ही आयोजकांच्या हाती निराशाच आली. सध्या बावधन आणि लवळे गावांच्या सिमेवर असलेल्या ‘ऑक्सफर्ड गोल्फ क्लब’च्या खासगी जागेवर महोत्सव घेण्याचे नियोजन केले जात आहे. हा महोत्सव येथे होऊ देणार नसल्याचा निर्धार बावधन, लवळे येथील ग्रामस्थ आणि हिंदू जनजागृती समितीने पत्रकार परिषदेत बोलून दाखवला आहे.

बावधन आणि लवळे गावांच्या सीमेवर महोत्सव घेण्यासंबंधी कोणतीच परवानगी आयोजकांना अद्याप मिळाली नाही. मात्र, प्रत्यक्षात येथे कामाला सुरुवात झाली असून ते कोणत्या अधारावर, असा सवाल करण्यात आला आहे. लवळे आणि बावधन येथे अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे येथे हा महोत्सव झाल्यास येथील तरुणाई व्यसनांच्या आहरी जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा महोत्सव पुण्यातच काय राज्यात कुठेच होऊ, नये यासाठी आंदोलन उभारले जाणार असल्याचे हिंदू जनजृतीची समितीचे पराग गोखले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेेला बावधन येथील महिला ग्रामपंचायत सदस्या, सदस्य आणि पराग गोखले उपस्थित होते.

सरकारला नेमका काय लाभ होणार?
राज्यातील पर्यटन आणि महसूलवाढीसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सनबर्न महोत्सवात सहभागी झाला आहे. मात्र, महोत्सवाच्या आयोजकांनी गेल्यावर्षी सरकारचा कर बुडवून सरकारची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा कार्याक्रमांना पाठींबा देऊन सरकारला काय लाभ होणार आहे, असा प्रश्‍नही विचारण्यात आला आहे.

शनिवारी आंदोलन
ग्रामस्थांचा विरोध डावळून गेल्यावर्षी शेवटच्या क्षणी सनबर्नला परवानगी देण्यात आली होती. यंदा तर सरकारच आयोजनामध्ये सहभागी असल्याने परवानगी मिळण्याची शक्यता अधिक आहे. कोणत्याच प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी येत्या शनिवारी लवळे येथील ग्रामस्थ आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कार्यक्रमास्थळी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.