Thu, Apr 25, 2019 04:02होमपेज › Pune › #Women’sDayइथे मिळतोय मुलींच्या मासिक पाळीला सन्मान...

#Women’sDayइथे मिळतोय मुलींच्या मासिक पाळीला सन्मान...

Published On: Mar 08 2018 1:21AM | Last Updated: Mar 08 2018 1:21AMग्रामीण भागातील मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल जागृती करून त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्याचे ध्येय त्यांनी स्वीकारले. सुरुवातीला खेडोपाडी जाऊन 8 वी ते 10 वीच्या वर्गात शिकणार्‍या मुलींमध्ये आपलेपणाची जाणीव निर्माण केली. मासिक पाळीच्या जागृतीसाठी तालुक्यातील विविध गावांत त्यांनी भटकंती सुरू केली. सुरुवातीला वाड्यावस्त्या, प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळांमध्ये जाऊन त्यांनी मासिक पाळीबद्दलच्या चित्रफितीतून, अबोला राखणार्‍या मुलींना आधार दिला. मागील दोन वर्षांपासून सुरू केलेल्या अभियानाचे चीज म्हणजे, अवघ्या चार महिन्यांत त्यांनी बारामती तालुक्यातील तब्बल 13 हजार मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करून त्यांच्यामध्ये जागृती केली आहे. ही कामगिरी केली आहे बारामती तालुक्यातील शारदा शैक्षणिक  संकुलाच्या सुनंदा राजेंद्र पवार यांनी. 

महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी या अत्यंत संवेदनशील, पण तेवढ्याच महत्त्वाच्या प्रश्‍नावर ‘पुढारी’शी संवाद साधला. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची गरिबी, मोठे कुटूंब, रोजगारासाठी धावाधाव करणार्‍या अनेक परिवारांतील मुली मासिक पाळीबद्दल ब्र काढायला तयार होत नव्हत्या. विशेषतः मुलींचे आई-वडील अशिक्षित असल्याने रोजंदारी आणि शेतीच्या कामामध्ये त्यांचे मुलींकडे लक्षच नसते. त्यामुळे वयात येणार्‍या मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी दिव्य पार करावे लागणार होते.