पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन दिवसात आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. यापैकी दोन घटना भोसरी आणि एक घटना निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मनीष विठ्ठल काटे (45, रा. विकास हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी आत्महत्या केली आहे. मंगळवारी (दि. 7) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना निगडी परिसरात समोर आली आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला आहे. त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचार सुरू असताना पावणे दहा वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दुसर्या घटनेत सुरेश रामदास सोनी (52, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली. सुरेश यांनी देखील राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भोसरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
आत्महत्येची तिसरी घटना गुरुवारी (दि.9) सकाळी सात वाजताच्या सुमारास भोसरी परिसरात उघडकीस आली. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीने भोसरीतील पालिका रुग्णालयाजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
पिंपळे गुरवमध्ये कुजलेला मृतदेह आढळला
पिंपरी : पिंपळे गुरव येथील नदीपात्रात गुरुवारी (दि. 9) सकाळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अंदाजे 35 वर्षीय पुरुषाचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे गुरव येथील महाराजा हॉटेलनजीक नदीपात्रातील जलपर्णीमध्ये एक मृतदेह अडकला असल्याची माहिती मिळाली. पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाला पूर्णपणे जलपर्णीमध्ये अडकला असल्याने एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात जवानांना यश आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. आठ ते दहा दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मृतदेह अंदाजे 35 वर्षीय पुरुषाचा असून त्याची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.