Tue, Jul 23, 2019 06:34होमपेज › Pune › दोन जिवलग मैत्रिणींची खडकवासलात आत्महत्या

दोन जिवलग मैत्रिणींची खडकवासलात आत्महत्या

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:53AMपुणे / खडकवासला : प्रतिनिधी 

किरकटवाडी येथील दोन जिवलग मैत्रिणींनी एकाच वेळी पुणे-पानशेत रस्त्यालगतच्या चौपाटीजवळ खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सिंहगड-खडकवासला परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे; मात्र दोघींनी आत्महत्या का केली याचे गूढ मात्र अद्याप कायम आहे. निक्की रामइकबाल पांडे (वय 15) व सुरभी नागेंदर साह (वय 16) अशी या दोघी मैत्रिणींची नावे आहेत. 

पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दोन्ही मुलींच्या पालकांनी त्या हरवल्या असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान दोघींचे मृतदेह  बुधवारी (दि. 15) धरणाच्या तीरावर एकापाठोपाठ एक असे मिळून आले. पहिला  मृतदेह सापडला त्याच्याजवळच दुसरा मृतदेह सापडला. आदल्या दिवशी त्यांनी धरणात उडी मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पांडे व साह कुटुंबीय एक वर्षापासून किरकटवाडी येथे राहण्यास आले आहेत. ते मूळचे बिहारमधील गोपालगंज येथील असून, ते मोलमजुरी करतात. निक्की रामइकबाल पांडे व सुरभी नागेंदर साह या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. आई-वडील कामाला गेल्यावर त्या दोघी घरी एकट्याच असत. निक्कीला मोठा भाऊ असून, सुरभी एकटीच होती. सोमवारी (दि. 13) सकाळी आई-वडील कामाला गेल्यावर निक्की आणि सुरभी यांनी कोणालाही न सांगता घर सोडले. त्यांचे आई-वडील  संध्याकाळी कामावरून आल्यावर निक्की आणि सुरभी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांचा शोध घेतला; मात्र त्या घरी आल्या नव्हत्या. 

निक्कीचे  वडील रामइकबाल पांडे यांनी हवेली पोलिस ठाण्यात या दोघी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बुधवारी त्या दोघींचे मृतदेह खडकवासला धरणाच्या किनार्‍यावर मिळून आल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान त्या दोघींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही; मात्र पोलिसांनी याचा कसोशीने तपास सुररू केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.