होमपेज › Pune › पुणे : आरोपीची पोलिस कोठडीत आत्‍महत्या

पुणे : आरोपीची पोलिस कोठडीत आत्‍महत्या

Published On: Jun 15 2018 3:22PM | Last Updated: Jun 15 2018 3:22PMमंचर ः प्रतिनिधी

‘लॉकअप’मध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 14) सायंकाळी साडेसात वाजता घडली. सुलदास उंबर्‍या काळे ऊर्फ कुक्या काळे (वय 25, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पारधी समाजाचा आहे. दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख सुवेझ हक आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनीघटनास्थळी भेट दिली आहे.  

मंचर पोलिसांनी सुलदासला बुधवारी (दि.13)  अहमदनगर पोलिसांकडून लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील दरोड्यासंदर्भात त्याने कबुली दिल्याने ताब्यात घेतले होते. गुरुवारी त्याला घोडेगाव न्यायालयाने चार दिवसांची  पोलीस कोठडी दिली होती. त्याला अंथरण्यासाठी दिलेल्या ब्लँकेटची रस्सी बनवून स्वच्छतागृहाच्या खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले.मंचर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कांबळे हे घोडेगाव सबजेल येथे गार्ड ड्युटी म्हणून नेमणुकीला होते. त्यांची ड्युटी चालू असताना त्यांना त्यांच्या कस्टडीतील आरोपी दिसला नाही.

त्यामुळे त्यांनी कस्टडीतील शौचालयाकडे पाहिले असता शौचालयाचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. कांबळे यांनी आरोपीस हाका मारल्या असता आतून प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी ड्यूटीवर असलेल्या सहकार्‍याला बोलावून लॉकअपमधील शौचालयाचा दरवाजा उघडून पाहिले असता आरोपी सुलदासने गळफास घेतल्याचे दिसून आले. सुलदासच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुण्यातील ससून हॉस्पिटल येथे होणार असून तीन डॉक्टरांचे पॅनल शवविच्छेदन करणार आहेत. इन्क्वेस्ट पंचनामा हा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शवविच्छेदन करतेवेळी व्हिडिओग्राफी होणार आहे. या घटनेबाबत घोडेगाव पोलिस ठाणे येथे आकस्मात मयत दाखल झालेले आहे. तपास घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार करीत आहेत.