Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Pune › पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न 

पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न 

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMपुणे : प्रतिनिधी

घरफोडी गुन्ह्यांत पोलिस कोठडीत (लॉकअप) असणार्‍या दोन आरोपींनी गळ्यावर तसेच छातीवर धारधार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आरोपींना कोेंढवा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना तेथील पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले. त्यावेळी आरोपींना तेथे ब्लेडचा तुकडा सापडला. तो त्यांनी तोेंडात लपवला होता. त्यांना विश्रामबागच्या पोलिस कोठडीत ठेवण्यास आल्यानंतर दोघांनी पहाटे स्वच्छतागृहात जाऊन लपविलेल्या ब्लेडने वार करून घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोरखसिंग गागासिंग टाक (वय 27) व तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय 23, रा. रामटेकडी, हडपसर) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍य सराईतांची नावे आहेत. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर मध्यवस्थीतील विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत (लॉकअप) ठेवले जाते. त्यानुसार या दोघांना येथे ठेवण्यास कोेंढवा पोलिसांनी गुरुवारी रात्री ठेवण्यासाठी आणले होते. कर्तव्यावरील संबंधित कर्मचार्‍यांनी त्यांची तपासणी करून विश्रामबाग पोलिस कोठडीतील तिसर्‍या क्रमांकाच्या खोलीत ठेवले. त्यांनी शुक्रवारी (दि. 6 मार्च) पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी पोलिस कोठडीच्या स्वच्छतागृहात गेले.

त्याठिकाणी कोणत्या ब्लेडने किंवा धारधार हत्याराने गळ्यावर, पोटावर, हातावर तसेच छातीवर वारकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेथील इतर आरोपींने आरडा-ओरडा करून हा प्रकार कर्मचार्‍यांना सांगितला. कर्मचार्‍यांनी तत्काळ धाव घेऊन दोघांना रुग्णालयात नेले.  त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.   कोेंढवा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना ठाण्यातील पोलिस कोठडीत ठेवले होते. त्यावेळी दोघांना ब्लेडचे तुकडे सापडले. दोघांनी न कळत ब्लेडचे तुकडे मिळवून ते तोेंडात लपविले होते. त्यानुसार, त्यांनी लपवून आणलेल्या ब्लेडने वार करून घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सोनवणे हे करत आहेत.