Thu, Aug 22, 2019 08:58होमपेज › Pune › यंदाचा ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोंबरपासून सुरू होणार (video)

यंदाचा ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोंबरपासून सुरू होणार (video)

Published On: Aug 08 2018 3:16PM | Last Updated: Aug 08 2018 5:12PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील 2018-19 या चालूवर्षीचा ऊस गाळप हंगामा येत्या १ऑक्टोंबरपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. साखर संकुल येथे ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्यांची बैठक सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

राज्यात चालुवर्षी ११.६२ लाख हेकटर क्षेत्रावर ऊस पीक उभे आहे. गेल्या वर्षीपेक्षा चालूवर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र 2.66 लाख हेक्टरने अधिक असल्याचे सांगून ते म्हणाले की,  चालू वर्षी 195 साखर कारखाने सुरू होण्याची अपेक्षा असून 941 लाख टन ऊस गाळपातुन चालुवर्षीही  १०७ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी उसाची हेक्टरी उत्पादकता अधिक राहिल्याने साखर उत्पादन  अधिक झाले. चालुवर्षी उत्पादकता कमी राहण्याची शक्यता असल्याने साखर उत्पादन गतवर्षी एवढेच होईल.

कारखान्याच्या कर्जाबाबत समिती गठीत

साखर कारखान्याच्या कर्जाबाबत एका समितीचे गठन करण्यात आले असून  कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत निर्णय समितीकडून घेतला जाईल. जेणेकरून बॅंकेला अडचण येणार नाही आणि ऊस गाळपही वेळेत सुरू होण्यास मदत होईल. आजच्या बैठकीला राज्य सहकारी बँक, नाबार्डच्या  प्रतिनिधीचा  समितीमध्ये समावेश आहे.  गतवर्षीची थकित एफआरपीची रक्कम सुमारे ५०० ते ५५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. माझ्या स्वतःच्या लोकमंगल कारखान्याची १६ कोटी रुपये थकीत आहे. साखरेचे भाव पडल्याने थकित रक्कम देण्यास कारखान्यांनी मुदत मागितली आहे. सर्व कारखाने थकीत रक्कम वेळेत देतील याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

चालुवर्षीच्या मुबलक उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी आजारी साखर कारखाने चालू करण्यास सरकारने प्राधान्य दिलेले आहे. किमान १० कारखाने चालू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपलब्ध उसाचे शंभर टक्के गाळप होण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी अडचणी येत आहेत. आत्तापर्यंत अनेकजण, खाजगी व्यक्ती या ठिकाणी कारखान्यावर जाऊन आल्यानंतर प्रत्यक्षात कारखाना सुरू करण्यासाठी तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा उलगडा आतापर्यंत झालेला नाही.  यांच्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. अगदीच कोणी पुढे आले नाही तर   शासनच यशवंत कारखाना सुरू करेल अशी स्पष्टोक्ती त्यांनी आज या ठिकाणी दिली.

 यंदाही ऑनलाइन गाळप परवाने देणार

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गाळप परवाने ऑनलाइन पद्धतीने दिले जातील. तसेच वजन काट्याची तपासणी करण्याकरिता भरारी पथकाची नेमणूक केली जाईल. कोणत्याही कारखान्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असे सहकारमंत्री देशमुख म्हणाले. राष्ट्रीय कृषी विकास योजने मधून ऊस तोडणी यंत्र अनुदान दिले जात होते, ही योजना बंद झालेली आहे. कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याची  मागणी आजच्या बैठकीत केलेली आहे.  याबाबत मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी ऊस तोडणी यंत्र योजना सुरू ठेवण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर  अनास्कर, खासदार धनंजय महाडिक, साखर संचालक, सह संचालक, कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते.