Tue, May 21, 2019 04:16होमपेज › Pune › उसाची ‘व्हीएसआय १२१२१ जात प्रसारित करण्यास मान्यता

उसाची ‘व्हीएसआय १२१२१ जात प्रसारित करण्यास मान्यता

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:53AMपुणे :प्रतिनिधी

उसाला तुरा न येणारी, फुटवे व पक्व उसांची संख्या जास्त असणारी, जलद वाढीबरोबरच को 86032 पेक्षा जास्त ऊस व साखर उत्पादन देणारी, खोडवा पिकाचे चांगले उत्पादन देणारी, 13 ते 14 महिन्यांत तयार होणार्‍या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा ‘व्हीएसआय’कडून संशोधित उसाच्या नवीन जातीचा प्रसार करण्यास संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. ‘व्हीएसआय 12121’ (व्हीएसआय 08005) असे या ऊस जातीचे नाव आहे.

ऊसपीक शेतकर्‍यांना अधिक फायदेशीर होण्यासाठी व्हीएसआयकडून संशोधन करण्याचे काम सुरू आहे. संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ऊस प्रजनन केंद्रामधून पहिली नवीन ऊस जात शोधून काढण्यात आली. ही जात को-0310 आणि को-86011 या दोन वाणांचा संकर करून सन 2008 मध्ये तयार केली. तसेच अखिल भारतीय ऊस संशोधन समन्वयित प्रकल्पांतर्गत नुकतीच दक्षिण भारतात ही नवीन जात पहिली आलेली आहे. शिवाय शेतकर्‍यांच्या अधिक पसंतीस उतरलेली आहे. 

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये 46 व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या दिनांक 24 ते 26 मेदरम्यान झालेल्या बैठकीमध्ये या जातीचा प्रसार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तशी माहिती व्हीएसआयचे ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी दिली.

नव्या ऊस जातीच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या तिन्ही हंगामात या जातीची लागवड करता येते. कांडीमध्ये दशीचे प्रमाण अजिबात राहत नाही. पानांवर कूस नसलेली, धाग्याचे प्रमाण अधिक असल्याने जातीमध्ये कडकपणा हे गुण यामध्ये आहेत. ही जात काणी, तांबेरा, लाल रंगाच्या होणार्‍या रोगास मध्यम प्रतिकारक आहे. एकूण 73 चाचणी प्रयोगांच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, या जातीचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी 141.24 टन आहे.  सरासरी साखर उत्पादन 20.31 मेट्रिक टन प्रतिहेक्टरी मिळते. या जातीमध्ये रसातील साखरेचे प्रमाण को-86032 पेक्षा 4.24 टक्के जास्त आहे.

या वाणाचे खोडवा पीक चांगले येत असून त्याची उत्पादकता 121.12 मे.टन इतकी आहे. को-86032 या तुल्य वाणापेक्षा उत्पादन 18.85 टक्के व साखर उत्पादन 21.15 टक्के व खोडवा उत्पादन 15.42 टक्के जादा मिळते. व्हीएसआयकडून संशोधित हा नवा ऊस वाण गुळासाठीसुध्दा अधिक फायदेशीर आहे. या ऊस जातीचे शुध्द बेणे व्हीएसआयमार्फत कारखाना व शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. इतर कोठूनही परस्पर बेणे आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.