Fri, Mar 22, 2019 23:01होमपेज › Pune › साखरेच्या तेजीला ‘ब्रेक’

साखरेच्या तेजीला ‘ब्रेक’

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

घाऊक बाजारात साखरेच्या तेजीला ब्रेक लागला असून, कारखान्यांकडील निविदांही क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांनी कमी झाल्या आहेत, असे व्यापार्‍यांनी सांगितले. घाऊक बाजारात एस् 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा भाव 3250 ते 3300 रुपयांवर आला आहे.

शेतकर्‍यांना उसाच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखान्यांकडून आता कोट्यानुसार साखर विक्रीची घाई सुरु झाली आहे. तर साखर आयुक्तालयाकडूनही रक्कम देण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे एफआरपीची रक्कम देण्यासाठी वाढलेले भाव कमी करुन, साखर विक्रीस कारखान्यांकडून प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले.केंद्र सरकारने जून महिन्यासाठी 21 लाख टनांचा साखरेचा कोटा जाहिर केला. तसेच साखरेचे भाव बांधून विक्रीचा निर्णयही घेतला. त्यानुसार क्विंटलला 2900 रुपये भाव निश्‍चित करण्यात आले. आदेशानंतर सुरु झालेली साखरेच्या भावातील तेजी गेली 15 दिवस कायम राहिली आहे. 

केंद्राकडून साखर उद्योगासाठी पॅकेज जाहिर होण्याच्या शक्यतेनंतर घटलेल्या 2360 रुपयांपर्यंतच्या साखर निविदा वाढून 3150 ते 3200 रुपयांवर पोहोचल्या आणि घाऊक बाजारातही साखरेने क्विंटलला 3350 ते 3400 रुपयांची पातळी गाठली होती. मात्र, बाजारपेठेत साखरेला अपेक्षित मागणी नसल्याने साखर निविदा शंभर ते दीडशे रुपयांनी घटून क्विंटलला 3000 ते 3050 रुपयांवर आल्या आहेत.

शेतकरी आंदोलनाचा धसका....

ऊस गाळप हंगाम संपुष्टात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी एफआरपीच्या रकमेसाठी साखर आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 29 जूनपासून आंदोलनास सुरुवात होणार असून, एफआरपीची रक्कम मिळाल्याशिवाय साखर आयुक्तालयासमोरुन उठणार नसल्याचेही शेट्टी यांनी जाहिर केले आहे. दुसरी बाब म्हणजे ‘स्वाभिमानी’कडून आत्तापर्यंत झालेली आंदोलने पाहता ऐनवेळी आंदोलनाची दिशा बदलण्यात येवू शकते. त्याचा धसका आयुक्तालयाने घेतला असून, कारखान्यांना नोटिसा काढल्याने पुढील आठवड्यात थकित एफआरपीचा विषय ऐरणीवर येणार आहे. हंगाम 2017-18 मधील 31 मे अखेरच्या अहवालानुसार एफआरपीचे 1 हजार 768 कोटी रुपये थकित राहिलेले आहेत.