Mon, Apr 22, 2019 12:10होमपेज › Pune › साखरेचे दर वाढण्याची शक्यता

साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:33AMशिवनगर : प्रा. अनिल धुमाळ

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार आता शिल्लक साखरेच्या फक्‍त 17 टक्केच साखर फेब्रुवारी महिनाअखेर साखर कारखानदारांना विकता येणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली साखरेच्या दरातील घसरण थांबून साखरेला चांगला बाजार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी साखर कारखानदारीला उभारी मिळून ऊस उत्पादकांना अधिकचे पैसे देण्यास मदत होईल, असे मत साखर कारखानदारीतील जाणकार व्यक्‍त 
करीत आहेत.

सध्या साखर धंदा अडचणीत आलेला असताना साखर कारखान्यांना दिलासा देणारा साखर विक्री मर्यादा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. दि. 8 फेब्रुवारीला केंद्र सरकारने साखर विक्रीसंबंधी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस शिल्लक साखरेचा साठा अधिक फेब्रुवारी महिन्यात उत्पादित झालेली साखर यांच्यामधून फेब्रुवारी महिन्यात निर्यात केलेली साखर वजा करता साखरेचा जो साठा शिल्लक राहील त्यामधील केवळ 17 टक्केच साखर आता साखर कारखान्यांना विक्री करता येणार आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात साखर विक्री करताना फेब्रुवारी महिन्याच्या अखेर दिलेल्या सूत्रानुसार शिल्लक राहिलेल्या साखरेच्या फक्‍त 14 टक्केच साखर मार्च महिन्यात साखर कारखानदारांना विक्री करता येणार आहे. त्यामुळे साखर विक्रीवर मर्यादा येऊन साखरेचे दर वाढण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली त आहे.

सध्या साखरेचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत, त्यामुळे साखर कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. साखरेतील घसरणारे दर पाहता 3 हजार 400 ते 3 हजार 500 रुपये क्विंटल साखरेचे दर जवळपास 2 हजार 800 रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे राज्यासह देशातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. जाहीर केलेल्या ऊसदरानुसार ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पैसे देताना साखर कारखानदारांची दमछाक होत आहे. आता मात्र केंद्र शासनाच्या साखर विक्री मर्यादा आदेशानुसार साखर कारखान्यांना साखर विक्री बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे बाजारात साखर कमी उपलब्ध होणार असल्याने साखरेचे दर वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
दरम्यान संबंधित आदेश हा फक्त फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांसाठीच लागू असल्याने याच्या अंमलबजावणीकडे काळजीपूर्वक पाहिले गेले पाहिजे, अन्यथा याचा फायदा घेत काही साखर कारखानदार केंद्र सरकारचा आदेश धाब्यावर बसवत साखरेला चांगले दर मिळतात हे पाहून साखर विक्री मर्यादेचे उल्लंघन करुन अधिकची साखर विकून नफाखोरी करण्याची शक्यता देखील जाणकार व्यक्त करीत आहेत.

राज्यासह देशाला साखर उद्योग जास्तीचे महसूल मिळवून देतो, मात्र या व्यवसायाकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील केला जातो.आता मात्र साखर विक्री मर्यादा आदेशामुळे साखरेचे कोसळणारे दर थांबण्यास मदत होणार आहे. साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने साखर जगतातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.