Tue, Mar 26, 2019 01:49होमपेज › Pune › ‘व्हीएसआय’च्या सभेतून साखर उद्योगाच्या पदरात काय पडणार?

‘व्हीएसआय’च्या सभेतून साखर उद्योगाच्या पदरात काय पडणार?

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात घसरत असलेले साखरेचे भाव आणि राज्य सहकारी बँकेकडून साखरेवर देण्यात येणार्‍या उसासाठीच्या उचल रकमेत करण्यात आलेल्या कपातीच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखाने अडचणीत आल्याची ओरड सुरू झालेली आहे. त्यामुळे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम कशी द्यायची, या विवंचनेत कारखाने आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत मंगळवारी (दि.26) साखर उद्योगाच्या पदरात काय पडणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

व्हीएसआयीची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मांजरी येथील मुख्यालयात होत आहे. सभेत प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार हे अध्यक्षस्थानी असून अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ठ कामगिरीसाठी दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांचे  वितरण करण्यात येणार आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होताना साखरेचे भाव क्विंटलला 3500 ते 3550 रुपये होते. मात्र, नवीन साखर उपलब्ध होताच निविदा 3100 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. क्विंटलला 400 ते 450 रुपयांच्या घसरणीमुळे राज्य बँकेंकडून साखरेवरील तारण कर्ज तथा मुल्यांकनाची रक्कम कमी करण्यात आली. 20 डिसेंबरच्या नव्या निर्णयानुसार 2 हजार 635 रुपये रक्कमेतून उसासाठी प्रति टनास 1 हजार 885 रुपये उचल रक्कम ठरविण्यात आली आहे.

तर एफआरपीचा साडे नऊ टक्क्यांचा दर 2 हजार 550 रुपये आहे. त्यामुळे यामधील वाढत जाणारी फरकाची रक्कम कारखान्यांची डोकेदुखी झाली आहे. साहजिकच शेतकरी संघटनांची जादा दराची मागणी, एफआरपीची रक्कम देण्यास कारखान्यांकडून सुरु झालेला विलंब या पार्श्‍वभूमीवर वार्षिक सभेत कोणते विचारमंथन होणार आणि राज्य सरकार यामध्ये काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे राहील. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

ताळमेळ बसणार कसा?

साखरेचे भाव संपूर्ण देशातच कमी झालेले आहेत. एकीकडे ऊस उत्पादन खर्चात वाढ होत असताना साखरेचे दर कमी होण्यावर रकमेतील ताळमेळ कसा बसणार असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे. एफआरपीची रक्कम 2300 वरुन 2550 रुपये झालेली आहे. ऊस उत्पादन खर्चही वाढत चालला आहे. तर साखरेचे भाव घसरल्यामुळे एफआरपीच्या देय रकमेतील तफावत भरुन काढण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे. उपपदार्थातून मिळणारी रक्कम अपेक्षित असली तरी तत्काळ एफआरपीची रक्कम देण्यासाठी कमी भावात साखर विक्री करण्याकडे कल वाढत चालल्याचेही सांगण्यात आले.