Fri, Apr 26, 2019 17:32होमपेज › Pune › पुणे : साखरेचे भाव पुन्हा शंभर रुपयांनी  उतरले

पुणे : साखरेचे भाव पुन्हा शंभर रुपयांनी  उतरले

Published On: Dec 09 2017 4:29PM | Last Updated: Dec 09 2017 4:29PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात ऊस गाळप हंगाम जोमाने सुरु झालेला आहे. शेतकर्‍यांना उसाची पहिली उचल रक्कम देण्यासाठी कारखान्यांकडून साखर विक्रीचे प्रमाण वाढले असून निविदांचे भाव खाली आले आहेत. त्याचा परिणाम घाऊक बाजारपेठेवर होवून मागणीअभावी साखरेचे भाव क्विंटलला पुन्हा शंभर रुपयांनी कमी झालेले आहेत. शनिवारी एस् ३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा भाव ३४५० ते ३५०० रुपयांवर आलेला असल्याचे सांगण्यात आले.

सध्या सणांची धामधूम नसल्याने बाजारपेठेत सध्या मागणी कमीच आहे. तसेच नियमित ग्राहकांकडूनही साखरेला उठाव कमीच असल्याचे सांगून पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय गुजराथी म्हणाले की, साखरेच्या निविदा वस्तू आणि सेवाकरविरहित (जीएसटी) ३२०० ते ३२२५ रुपयांपर्यंत खाली आलेल्या आहेत. त्यावर ५ टक्के जीएसटीचा कर आणि वाहतूक भाड्याचा विचार करता हे भाव वाढतात. मात्र, त्या स्थितीतही साखरेला उठाव कमीच आहे. लग्नसराई असूनही साखरेला अपेक्षित मागणी नसल्याने भाव उतरण्यास मदत होत आहे.

राज्यात चालूवर्षी साखरेचे उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे. तसेच देशपातळीवरही साखरेचे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्राऐवजी उत्तरप्रदेशातून साखरेची खरेदी करण्याकडे अन्य राज्यांचा कल वाढत चालला आहे. त्याठिकाणी महाराष्ट्रापेक्षा कमी भावात साखर उपलब्ध होत असून वाहतुकीचा खर्चही कमी येत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून साखरेच्या भावात मागणीअभावी घसरण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे ‘पुढारी’ शी बोलताना म्हणाले की, चालूवर्षी देशात २५५ ते २६० लाख टनाइतके साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. तर गतवर्षीचा शिलकी साठा ४० लाख टन आहे. त्यामुळे साखरेची एकूण उपलब्धता सुमारे २९० लाख टनाच्या आसपास राहील. देशांतर्गत साखरेचा खप सुमारे २५० लाख टनाइतका आहे. त्यामुळे २०१७-१८ चा ऊस गाळप हंगाम संपताना मागणीपेक्षा साखरेचा ३५ ते ४० लाख टनाइतका अधिक साठा शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साखरेचे भाव मंदीकडे झुकले आहेत.