Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Pune › साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपये निर्यात अनुदान हवे

साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपये निर्यात अनुदान हवे

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:01AMमंचर : प्रतिनिधी

यंदाच्या साखर गाळप हंगामा अखेर देशातील साखर उत्पादन 305 ते 310 लाख टन अशा विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे. त्यामुळे देशातून किमान 40 ते 50 लाख टन साखर निर्यात होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाने साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपये निर्यात अनुदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले. येथे शनिवारी  पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले, 12 एप्रिलअखेर देशस्तरावर 2775 लाख टन उसाचे गाळप  झाले असून 296 लाख टन नवे साखर उत्पादन झाले आहे. अजून 200 साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. त्यामुळे या हंगामा अखेर देशातील साखर उत्पादन 305 ते 310 लाख टन असे विक्रमी उत्पादन होणार आहे. या मुळे देशातून किमान 40 ते 50 लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीतील निर्यातीचे आंतरराष्ट्रीय दर व स्थानिक बाजारातील दर यातील एक हजार रुपये प्रति क्विंटल असणारी तफावत निर्यात अनुदान दिल्याशिवाय भरून येणार नाही. यासाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरदरात झालेली घसरण व त्यामुळे कारखान्यांच्या बँकेतील खात्यात निर्माण झालेला अपुरा दरावा यामुळे कारखान्यांची झालेली थकीत कर्ज खाती या सर्वाचा झालेल्या एकत्रित परिणामामुळे उस उत्पादित शेतकर्‍यांच्या उसाच्या थकबाकी ने 20 हजार कोटी रुपयांची पातळी गाठली आहे. व ते हंगामा अखेर विक्रमी 25 ते 30 हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या मुळे देशातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. दुसरीकडे बँकेकडूून नवे कर्ज न मिळाल्याने पुढील वर्षाचा गाळप हंगाम कारखाने सुरू करू शकणार नाहीत. त्यामुळे 51 लाख हेक्टर क्षेत्रावर उभ्या असलेल्या उसाचे काय करायचे हा यक्ष प्रश्न सरकारसमोर उभा ठाकणार आहे.

Tags : Pune, Sugar, subsidy,  rupees, one, thousand, rupees, export