Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Pune › साखर खरेदीत सट्टेबाजांची चांदी

साखर खरेदीत सट्टेबाजांची चांदी

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:26AMपुणे ः प्रतिनिधी 

राज्यात मागील एक ते दीड महिन्यात कमी भावात साखरेची मुबलक खरेदी करुन, वाढीव भावात विकण्याचा सर्वाधिक फायदा हा साखरेच्या सट्टेबाजांना झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी साखर निविदा 2360 रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या, त्या वाढून 2600 रुपयांपर्यंत पोहोचल्या. या दरम्यान मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करुन सध्याच्या साखर भावातील तेजीमध्ये सट्टेबाजांची चांदी झाल्याचे स्पष्ट होत आहे. साखरेचे भाव पडल्यानंतर निविदांमध्ये व्यापार्‍यांनी केलेले सौदे, भाव बांधल्यानंतर रद्द करण्यात आले. 2900 रुपये क्विंटलपेक्षा कमी भावात साखर विक्री न करण्याचे बंधन कारखान्यांवर नव्याने टाकण्यात आले.

यामध्ये  व्यापार्‍यांचे नुकसान झाल्याने ओरड सुरु आहे. तर सट्टेबाजांनी चर्चेपासून अलिप्त राहून, साखरेमध्ये क्विंटलला किमान 500 ते 600 रुपयांचा बक्कळ नफा मिळविल्याची चर्चा सुरु आहे. कारखान्यांकडून हंगामात 2900 रुपये क्विंटल भाव असूनही माल विक्रीस हात आखडता घेण्यात येत होता. त्याच कारखान्यांकडून 2400 रुपये भावात माल विक्रीसाठी स्पर्धा सुरु झाली होती. यामध्ये देशभरातील साखरेच्या काही सट्टेबाजांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी केली. महाराष्ट्रातही या खरेदीत त्यांनी विशेष ‘रस’ घेतला आणि साखर साठा गोदामांमध्ये करुन ठेवल्याचे बोलले जाते. 
त्यांना शंभर कोटींचा फायद्याची शक्यता

गेल्या तीन आठवड्यात साखरेच्या भावात क्विंटलमागे सुमारे सातशे रुपयांची निव्वळ वाढ झालेली आहे. या दरम्यानच्या काळात राज्यात सट्टेबाजांकडून किमान दोन लाख टन, म्हणजे सुमारे 20 लाख क्विंटल साखरेची खरेदी करुन ती गोदामात ठेवण्यात आली. त्यातून काही मोजक्या सट्टेबाजांना किमान शंभर कोटी रुपयांहून अधिक फायदा झालेला आहे. त्यामुळे कमी दरात काही ठराविक लोकांनाच साखर विक्री कशी झाली? याची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे यांनी केली आहे.