Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Pune › ‘दीनानाथ’प्रकरणी अहवाल सादर

‘दीनानाथ’प्रकरणी अहवाल सादर

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी

दीनानाथ रुग्णालयात झालेल्या ‘मांत्रिकोपचार’ प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाला अंतिम अहवाल पाठवला आहे. यामध्ये संध्या सोनवणे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, दीनानाथ रुग्णालयामधील नर्स यांचे जबाब तसेच उपचारांची कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत. हा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
दीनानाथ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या महिला रुग्णावर तिच्या खासगी डॉक्टरने परस्पर मांत्रिकाद्वारे फुले व इतर वस्तू डोक्यापासून पायापर्यंत सहा वेळा उतरून टाकल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता.  महिलेचा 11 मार्चला मृत्यू झाला होता. 

यानंतर नातेवाईकांनी जादुटोणा असल्याचा आरोप करत मांत्रिक व त्याला बोलावणारा रुग्णालयाच्या बाहेरील डॉ. सतीष चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

या प्रकरणाची दखल आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी घेत उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला आहे का याची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले होते. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी तत्काळ एक  प्राथमिक चौकशी अहवाल त्यांना सादर केला. तसेच बुधवारी तपशीलवार अहवाल सादर केला आहे.

या अहवालामध्ये कोणत्या शिफारशी केल्या आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये संध्या यांच्यावर उपचार करणारे डॉ. सतीश चव्हाण, डॉ. अनुराधा कुकडे, डॉ. शिवाजी विभूते आणि डॉ. धनराज गायकवाड यांचे लेखी जबाब घेण्यात आले आहेत. तसेच दीनानाथ रुग्णालयमधील मांत्रिकाचा व्हिडिओ काढताना तेथे उपस्थित असलेली नर्स आणि फार्मासिस्ट यांचाही जबाब घेण्यात आला असल्याचे समजते. तसेच संध्या यांच्यावर उपचार करण्यात आलेल्या क्‍लिनिक, दवाखाने व रुग्णालये यांची महापालिकेकडे नोंदणी आहे का याचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  

 

Tags : pune, pune news,  Dinanath hospital case, report,