Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Pune › ‘कारखान्यांच्या वजनकाट्यांची 31 डिसेंबरअखेर तपासणी करा’

‘कारखान्यांच्या वजनकाट्यांची 31 डिसेंबरअखेर तपासणी करा’

Published On: Dec 23 2017 11:41AM | Last Updated: Dec 23 2017 11:41AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाच्या वजनात काटमारी न होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांकडील वजनकाट्यांची 31 डिसेंबरपर्यंत  तपासणी करण्याचे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेले आहेत. मात्र, वजनकाटे तपासणीसाठी आत्तापर्यंत राज्यातील केवळ नऊ जिल्ह्यातच भरारी पथकांची स्थापना झालेली असल्याने सहकार मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी राज्यात कशी होणार? याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले आहे. 

ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून उसाचे वजनात काटामारी होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शासनाने साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची स्थापना करण्याचे आदेश यापूर्वीच शासनाने दिलेले आहेत. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून भरारी पथके स्थापन करण्यासाठी साखर आयुक्तांना वारंवार पाठपुरावा केलेला आहे. तरीसुध्दा शुक्रवारपर्यंत (दि.22) राज्यात पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, सोलापूर, हिंगोली, परभणी, यवतमाळ या 9 जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना झालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पथकाने पाच कारखान्यांच्या तपासण्या केल्या असून, त्यात एकही वजनकाटा दोषी आढळून आलेला नसल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

ऊस उत्पादक जिल्हे असलेल्या कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यामध्ये पथकेच स्थापन करण्यात आलेली नाहीत. जेथे पथके आहेत तेथे तपासणी झालेली नाही. त्यामुळे 31 डिसेंबर पुर्वी राज्यातील 176 कारखान्यांच्या तपासण्या होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, सहकार मत्र्यांची प्रादेशिक साखर सह संचालकांना  विशेष खबरदारी घेऊन तपासण्या पुर्ण करण्याचे आदेश शुक्रवारी साखर संकुल येथे झालेल्या बैठकीत दिलेले आहेत. बैठकीस साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, साखर सह संचालक दत्तात्रय गायकवाड, अशोक गाडे, प्रादेशिक साखर सह संचालकांमध्ये शशिकांत घोरपडे, सचिन रावळ, नीलीमा गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, याबाबत  साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांची भेट घेतली असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘शून्य ते 25, 25 ते 50 आणि 50 किलोमीटरपुढे ऊस वाहतूक दराचे अंतरनिहाय टप्पे वाहतूक दर कपातीची अंमलबजावणी चालूवर्षीच्या हंगाम 2017-18 मध्ये सुरु झालेली आहे. मात्र, याबाबतच्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी साखर कारखान्यांकडून होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर वाहतूक खर्चाची वजावट ही अंतिम ऊस दराच्या बिलावेळी आयुक्तालयाकडून शिक्कामोर्तब करून केली जाईल.’