Mon, Aug 19, 2019 05:12होमपेज › Pune › लिपिकावरील कारवाईसाठी मूर्तीकाराचे उपोषण

लिपिकावरील कारवाईसाठी मूर्तीकाराचे उपोषण

Published On: Jan 11 2018 1:29AM | Last Updated: Jan 10 2018 10:56PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

भिमसृष्टीचे काम मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे लिपिक तानाजी जगदाळे यांनी 10 लाख रूपये घेतले होते. मात्र, त्यांनी काम न देता आर्थिक फसवणूक केली आहे. याच प्रकारे इतर निविदा प्रक्रियेत हेतूपरस्पर डावलले जात असल्याने आल्हाट आर्ट स्टुडिओचे सुभाष आल्हाट आणि सहकार्‍यांनी सोमवारी (दि.8) महापालिका भवनासमोर उपोषण आंदोलन केले. या प्रकरणाचा अभ्यास करून 15 दिवसांत निर्णय घेतो, अशी ग्वाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना दिले. 

पालिका प्रवेशद्वारासमोर झालेल्या आंदोलनात सुभाष आल्हाट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर, लाला गायकवाड, उत्तम कांबळे, सुरेश आल्हाट, राजेश आल्हाट आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा प्रतिकृती तसेच, डॉ. आंबेडकर यांचा चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे मुरॅल्स आंदोलनस्थळी ठेवण्यात आले होते. 

आंदोलकर्त्यांनी महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांची भेट घेतली. आयुक्त हर्डीकर यांनी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास  करून 15 दिवसांत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. 

दरम्यान, पालिकेेच्या स्थापत्य विभागाचे लिपिक जगदाळे यांनी पिंपरी चौकातील भिमसृष्टीचे काम मिळवून देण्याचे आश्‍वासन देऊन 10 लाख रूपये  मूर्तीकार आल्हाट यांच्याकडून घेतले होते. त्यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही पालिका प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दहा वर्षांपूर्वी पालिकेच्या वर्कऑर्डरवरून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा कांस्य धातूचा सुमारे 11 लाखांचा पुतळा बनविला. जागा मिळत नसल्याने पुतळा बसविण्यास विलंब झाला. अखेर दीड वर्षांपूर्वी निगडीत पुतळा बसवूनही अद्याप 10 टक्के शिल्लक रक्कम व 5 टक्के अनामत रक्कम अदा केली नाही. 

आल्हाट स्टुडिओला डावलून एका ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून भिमसृष्टीचे काम दिले गेले. पालिका एका मागासवर्गीय लघुउद्योजक शिल्पकारावर अन्याय करीत आहे. लिपिक जगदाळेंवर कारवाई करावी, अशी मागणी आल्हाट यांनी केली आहे.