Sat, Apr 20, 2019 10:03होमपेज › Pune › आमदारास दाखविले स्टंट आंदोलन

आमदारास दाखविले स्टंट आंदोलन

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या सर्व मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनााला कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्टंट शब्द वापरून अवहेलना केली. आमदारांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ अलका (टिळक चौक)  चौकात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्टंट आंदोलन करून निषेध व्यक्‍त करण्यात आला.‘एक मराठा लाख मराठा’, ‘मुख्यमंत्री हाय हाय’, ‘आमदार मेधा कुलकर्णी हाय हाय’, आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा घेाषणा देत परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी मोर्चाचे संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, विराज तावरे, बाळासाहेब आमराळे, आश्‍विनी गाडे, पूजा झोळे, प्रदीप शिंदे, स्वाती पवार यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

मेधा कुलकर्णी यांनी एका वेब पोर्टलशी बोलताना या आंदोलनांना स्टंट म्हणून संबोधले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यांच्या घरासमोरील आंदोलनावेळी आंदोलक आणि त्यांच्या मुलामध्ये वाद झाले होते. कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि आंदोलन आणि स्टंट यातील फरक दाखविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यातील अलका चौकात स्टंट आंदोलन करण्यात आले. या वेळी दोन बाईकर्सनी विविध स्टंट करून दाखवले. चौकातील एका बाजूची वाहतूक वळवून हे आंदोलन करण्यात आले. काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट यावेळी करण्यात आले. हे स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी या चौकात झाली होती. आंदोलनाविषयी बोलताना प्रशांत धुमाळ म्हणाले, मेधा कुलकर्णी यांनी मराठा आंदोलनाला स्टंट म्हणून त्याची थट्टा केली होती. त्यामुळे आंदोलन काय असते आणि स्टंट काय असतो, हे दाखविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.