Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Pune › लाखो विद्यार्थी राहणार उपाशी

लाखो विद्यार्थी राहणार उपाशी

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:15AM

बुकमार्क करा

पुणे ः नवनाथ शिंदे

प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटाला जिल्हा परिषदेकडून चार महिन्यांची बिले देण्यात आली नाहीत; त्यामुळे बचत गटांची माल खरेदीची पत संपल्याने आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. 

प्रशासनाकडून बचत गटांना ऑगस्ट महिन्यापासूनची इंधन, भाजीपाला आणि पूरक आहार तसेच धान्य आदी मालाची बिले  दिली जात नाहीत. त्यामुळे वैयक्तिक खर्च करून मालाची खरेदी करताना बचत गट, व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये बिले मिळाली नाहीत, तर खरेदीअभावी विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागणार आहे.

राज्यातील प्राथमिक शाळेमध्ये  पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या कंपनीचा करार  संपुष्टात आला आहे. दरम्यान नव्याने करार न झाल्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्हा परिषदेला गावोगावच्या बचत गटांकडून पोषण आहार  पुरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बचत गटांद्वारे पोषण आहार पुरविण्यात येत आहे. मात्र, ऑगस्टपासून जिल्ह्यातील शाळांत आहार पुरविणार्‍या बचत गटांना बिले देण्यात येत नाहीत.  

दुसरीकडे अनेक गावांतील बचत गट सक्षम नसल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांकडून मालाची खरेदी केली जात आहे. जिल्ह्यातील मोठ्या पटांच्या काही शाळांची चार महिन्यांची बिले 1 लाखावर पोहोचली आहेत; त्यामुळे दुकानदारांकडून माल देण्यास टाळाटाळ केली जात आहे; तर बचत गट, व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांची पत ढासळल्याने आणि बिले न मिळाल्यास विद्यार्थ्यांना उपवास घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या 3 हजार 689 शाळा आहेत; तर खासगी अनुदानित 133 आणि विनाअनुदानित शाळांची संख्या  383 आहे.  प्राथमिक शाळेत मुलांची संख्या तब्बल 1 लाख 20 हजार 918 असून, मुली 1 लाख 15 हजार 813 आहेत. गावोगावचे 2 लाख 36 हजार 731 विद्यार्थी धडे गिरवीत आहेत.  पोषण आहाराची बिले वेळेवर काढण्यास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागास मुहूर्त मिळत नाही.