Sat, Apr 20, 2019 08:50होमपेज › Pune › काही मिनिटांच्या उशिरामुळे विद्यार्थी ‘यूपीएससी’ला मुकले

काही मिनिटांच्या उशिरामुळे विद्यार्थी ‘यूपीएससी’ला मुकले

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:16AMपुणे :  प्रतिनिधी 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रविवारी घेतलेल्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या वर्गखोलीत पोहोचण्यासाठी अवघा काही मिनिटांचा उशीर झाल्याने अनेक परीक्षार्थी परीक्षेला मुकल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तर हडपसरमध्ये एकाच ठिकाणी चार परीक्षा केंद्रे असल्याने आणि त्यातही मार्गदर्शक सूचना नसल्याने  वेळेवर पोहोचूनदेखील दिलेल्या वेळेत वर्गखोलीत पोहोचण्यास केवळ तीन मिनिटांचा उशीर झाल्यामुळे परीक्षेस बसू न दिल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे.

पुण्यातील 74 उपकेंद्रांवर रविवारी ही परीक्षा पार पडली. साधारण 30 हजार 431 उमेदवार परीक्षेला बसले होते. यूपीएससीने दिलेल्या सूचनेनुसार सर्व परीक्षार्थ्यांनी दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी योग्य नियोजन करायचे आहे, असे प्रशासनाने सांगितले होते. पहिल्या पेपरसाठी 9 वाजून 20 मिनिटे व दुसर्‍या पेपरसाठी 2 वाजून 20 मिनिटांनंतर परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश मिळणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. या नियमानुसार परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी नियोजनदेखील केले होते. मात्र, परीक्षा केंद्रांवर योग्य नियोजन आणि नियंत्रणासाठी कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन नसल्याने परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने हडपसरच्या साधना शाळेमध्ये चार परीक्षा केंद्रांचे नियोजन केले होते. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने परीक्षार्थी आले होते. परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्राच्या आवारात पोहोचले, मात्र तेथील कोणत्या परीक्षा केंद्रात आपले नाव आहे याची माहिती ठळकपणे देण्यात आलेली नव्हती. तर वर्गखोलीत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आलेले नव्हते. प्रशासनाकडून माहिती देण्यासाठी कर्मचारी नेमले नव्हते. त्यामुळे वर्ग खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी परीक्षार्थ्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. या धावपळीत वेळेत पोहोचणारे परीक्षार्थी बसू शकले, तर काहींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे परीक्षार्थ्यांची काही वर्षांची मेहनत वाया गेली, असे परीक्षार्थ्यांनी सांगितले. शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर देखील सुरू नव्हते, अशी तक्रार परीक्षार्थ्यांनी केली आहे.