होमपेज › Pune › विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासावी : डॉ. माशेलकर 

विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासावी : डॉ. माशेलकर 

Published On: Feb 22 2018 1:24AM | Last Updated: Feb 21 2018 11:49PMपिंपरी : प्रतिनिधी

ऊर्जा आणि वाहतुकीच्या साधनांची  वाढ होत असताना पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. तो रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच अपारंपरिक ऊर्जा; तसेच पर्यावरणपूरक वाहनांची निर्मिती करण्याकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. भारतातही सौर-पवन ऊर्जा, बॅटरी-विजेवर चालणारी वाहने यावर संशोधन होत आहे. संशोधन वृत्ती जोपासण्याचे काम महत्त्वाचे असून, ‘स्पार्कल’सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना, विचारांना प्रोत्साहन मिळेल, असे मत ज्येष्ठ संशोधक  डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्‍त केले.

केपीआयटीने आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल- 2018’ या अभियांत्रिकी स्पर्धेमधील विजेत्या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पीसीसीओई महाविद्यालय शैक्षणिक भागीदार व भारत सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाने ज्ञान भागीदार म्हणून काम केले. सुमारे 21 लाखांच्या पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी डॉ. माशेलकर बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन, केंद्र सरकारच्या ऊर्जा तंत्रज्ञान विभागाचे सल्‍लागार सदस्य हरकेश मित्तल, प्रो. डॉ. पिटर ट्रोपश्च, डॉ. कार्लोस बिलक्ल, केपीआयटीचे सीईओ रवी पंडित, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले, डॉ. सी. एस. कुमार, डॉ. मिलन राणे, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर आदी उपस्थित होते.

डॉ. के. राधाकृष्णन  म्हणाले,  या पुढील काळात रस्त्यावरून वाहकविरहित वाहने फिरताना आपल्याला दिसतील. तशा प्रकारचे संशोधन वेगवेगळ्या कंपन्यांकडून होत आहे. या सर्वांचा विचार करता भारताचीदेखील मोठी प्रगती होईल. जगामध्ये भारताचे महत्त्व वाढले असेल. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः प्लॅटिनम  अ‍ॅवॉर्ड - आयआयटी खरगपूरच्या टीम इलेक्ट्रोड्स- (बॅक्टेरिया पॉवर बॅटरी) या प्रकल्पास; गोल्ड अ‍ॅवॉर्ड - मंगळूर येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीमला - (स्मार्ट हेल्मेट) प्रकल्पास मिळाले. सिल्व्हर अ‍ॅवॉर्ड दोन संघांना देण्यात आले - त्यामध्ये पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनिअरिंगच्या टीम नॅनोवोक्सला (ऑईलमिश्रीत पाणी शुद्ध करण्याचे संशोधन), तर पिंपरीतील डॉ. डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या टीम थर्मोला (स्वयंपाकाच्या वाया जाणार्‍या उष्णतेपासून ऊर्जा निर्मितीच्या) प्रकल्पास मिळाले. मोस्ट पॉप्युलर अ‍ॅवॉर्ड- हमीरपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूटच्या  प्रकल्पास मिळाले.