होमपेज › Pune › अभियांत्रिकीचे विद्यार्थी नापास 

अभियांत्रिकीचे विद्यार्थी नापास 

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:21AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा आणखी एक बोगस कारभार समोर आला आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा निकाल 2015 पॅटर्ननुसार लावणे आवश्यक असताना अचानक 2014 पॅटर्ननुसार हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या या चुकीच्या निर्णयामुळे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात आक्रमक होत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागासमोर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या निकालात कोणतीही चुक झाली नसून निकालाच्या पॅटर्नवर विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. 

विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराचा मोठा फटका बसला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात 2008 व 2012 च्या अभ्यासक्रमानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष नापास झाल्यामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांनी 2015 च्या पॅटर्ननुसार परीक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी पाचवी सेमिस्टर 2015 च्या नवीन पॅटर्नुसार दिली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षेचा निकालही 2015 च्या ग्रेड पॉईटनुसार ऑनलाईन जाहीर केला. या विद्यार्थ्यांनी तीसर्‍या वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षेचा अभ्यासही 2015 च्या ग्रेड पाँईट सिस्टिमनुसार केला होता. 

दरम्यान, सहावे सेमिस्टर अर्ध्यावर आले असताना अचानक विद्यापीठाने 18 मे रोजी परिपत्रक काढत 2008 व 2012 च्या अभ्यासक्रमानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 2014 च्या पॅटर्ननुसार लावण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांना कळविले. त्यातच विद्यापीठाने 2015 च्या पॅटर्ननुसार जाहीर केलेला पाचव्या सेमिस्टरचा निकाल प्रत्यक्ष गुणपत्रिका देताना विद्यार्थ्याना 2014 च्या पॅटर्ननुसार दिल्या. तर दोन दिवसापूर्वी लावलेल्या सहाव्या सेमिस्टरचा निकालही विद्यापीठाने 2014 च्या पॅटर्ननुसार लावला. विद्यापीठाच्या या गोंधळाच्या कारभाराचा फटका सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांना बसला असून सुमारे 500 विद्यार्थी नापास झाले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याविरोधात आक्रमक होऊन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (13 जुलै ) परीक्षा विभागापुढे जमत न निदर्शने केली.