होमपेज › Pune › ज्युनिअर के.जी.मध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्यांची हेळसांडज्युनिअर के.जी.मध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड

ज्युनिअर के.जी.मध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:13PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

वाढत्या स्पर्धेत आपली मुले टिकून राहावीत यासाठी पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मात्र त्यामुळे या शाळांची मनमानी वाढली आहे. येथील जयहिंद प्रायमरी स्कूलमध्ये ज्युनिअर के.जी.च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी नापास झाल्याने त्याचा दाखला काढून न्या, असे फर्मान शाळेने काढले आहे. पुन्हा त्याच वर्गात बसू देण्याची त्याच्या पालकांची विनंतीही शाळेने अव्हेरली आहे. श्रीकर ज्ञानदेव नाळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आणखी चार विद्यार्थ्यांबाबतही असाच प्रकार झाल्याचे समजते.

जग बदलत आहे तशी स्पर्धा वाढत आहे.  स्पर्धेत आपली मुले टिकून पुढे जावीत या भावनेतून पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढत आहे. त्याबरोबरच इंग्रजी शाळांची मनमानीही वाढत चालली आहे. काही वर्षांपूर्वी नागपंचमीच्या सणाला विद्यार्थिनी हाताला मेंदी लावून आल्याने पिंपरीतील जुडसन हायस्कूल शाळेतील शिक्षकांनी मुलींना वळ उठेस्तोवर छडीने शिक्षा केल्याचा प्रकार घडला होता. याच शाळेने मंगेश रत्नाकर कदम या विद्यार्थ्यास जास्त उंचीचे कारण दाखवून शाळेतून काढून टाकले होते. तर काळेवाडी तील  इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेने 250 रुपये फी येणे, राहिल्याने एका विद्यार्थ्यांच्या हातात थेट शाळा सोडल्याचा दाखला दिला होता. 

जयहिंद प्रायमरी स्कूलने मनमानी करण्यात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. पिंपरीगावातील श्रीकर ज्ञानदेव नाळे हा विद्यार्थी के.जी.च्या वर्गात नापास झाल्याने शाळेने त्याच्या पालकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याचा दाखला काढून न्या असे फर्मान काढले आहे. मुलगा नापास झाला आहे. तर त्याला त्याच वर्गात पुन्हा बसू द्या ही पालकांची विनंतीही शाळेने अव्हेरली. सरकार लहानग्यांच्या कोवळ्या वयाचा विचार करून काही चांगले निर्णय घेत आहे. मध्यंतरी इयत्ता आठवीपर्यंत परीक्षाच न घेण्याचा निर्णय हा त्यातूनच घेतला होता. मुलांच्या पाठीवरचे दप्‍तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्या त्या शाळांमध्येच दप्‍तरे ठेवण्याची व्यवस्था करण्याबाबतही आग्रह केला जात आहे. अन् दुसरीकडे काही इंग्रजी शाळा मुलांना असे चुकीच्या पद्धतीने वागवणार असतील तर ‘शिक्षणाच्या आयचा घो’ असा विचार पालकांच्या मनात आल्यास वावगे ठरणार नाही.

सदरचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी दै.‘पुढारी’ प्रतिनिधीने पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला असता, शाळांची ही असली मनमानी चालू देणार नाही आपण पालकांना न्याय मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले. माजी उपमहापौर डब्बू आस वानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे या प्रकारच्या पाच पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत आपण शिक्षण अधिकार्‍यांकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.